संगमनेरमध्ये बचत गटांमुळे उभे राहिले "गोकूळ!"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 March 2021

महिला बचतगटांच्या माध्यमातून सुरू केलेल्या दूधसंकलन केंद्रातून दैनंदिन 10 हजार लिटर दूध संकलित होते.

संगमनेर ः ः शिक्षण जेमतेम दहावी. मात्र, प्राप्त परिस्थितीवर मात करून महिला बचतगटांचं साम्राज्य उभं केलं. 107 गटांच्या माध्यमातून दोन हजार 140 महिलांना एकत्र केलं. त्यांना दुग्धव्यवसायासाठी प्रेरित केलं. अर्थसाह्य देत महिलांची ऍग्रो प्रोड्यूस कंपनी उभारली. संगमनेर तालुक्‍यातील उंबरी बाळापूर येथील कुंदा विलास उंबरकर यांच्या जिद्दीची ही कहाणी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

सामान्य शेतकरी कुटुंबातील कुंदा उंबरकर यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर विवाह झाला. पतीच्या साथीने त्यांनी दोन गायींवर चरितार्थासाठी दुग्धव्यवसायाला सुरवात केली. त्यानंतर 100 ते 150 लिटर दैनंदिन दुग्धोत्पादन सुरू झाले. जय हनुमान उद्योगसमूह सुरू करून दूधसंकलन केंद्र सुरू केले. त्यामुळे व्याप वाढला.

हेही वाचा - नगर जिल्ह्यात कोरोनाने हात आणि पाय पसरले

याचदरम्यान पती विलास यांना कर्करोगाचे निदान झाले. मात्र, या संकटावरही जिद्दीने मात करीत कुंदा उंबरकर यांनी सर्व व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. त्यात आधुनिकता आणली. महिलांचा बचतगट तयार करून त्यांना अर्थसाक्षर व स्वतःच्या पायावर उभे केले. त्याद्वारे तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या 107 महिला बचतगटांच्या माध्यमातून 2 हजार 140 महिला त्यांच्यासमवेत जोडल्या गेल्या आहेत. 

महिलांच्या पाठबळावर रोजगारनिर्मितीसाठी 2015मध्ये त्यांनी राधिका महिला ऍग्रो प्रोड्यूस कंपनीची स्थापना केली. आज कंपनीकडे 24 लाख 55 हजार रुपये भागभांडवल आहे. त्यातून बी-बियाणे, खते, औषधे, अर्थसाह्य, पीक व शेतकरी विमा, उत्पादनाची एकत्रित विक्रीव्यवस्था, प्रक्रिया व बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे उत्पादन निर्माण करणे, हा उद्देश साध्य होत आहे. या कंपनीमार्फत पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरू आहे.

महिला बचतगटांच्या माध्यमातून सुरू केलेल्या दूधसंकलन केंद्रातून दैनंदिन 10 हजार लिटर दूध संकलित होते. त्यातून सुमारे 10 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. या सर्व कामात त्यांना विलास उंबरकर यांची भक्कम साथ व मार्गदर्शन मिळाले. कुंदा उंबरकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सहकार्याने व त्यांच्या साथीने उभे केलेले मोठे काम सर्वांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरत आहे. 

निमगाव जाळी येथे उभारला मॉल 
वार्षिक नफ्याचे सर्वांना समप्रमाणात वाटप करण्यात येते. प्रत्येक सभासदाला बचतीप्रमाणे किराणा वाटण्यात येतो. निमगावजाळी येथे प्रशस्त व आधुनिक संगणकीकृत शॉपिंग मॉल उभारला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self-help groups set up a dairy business in Sangamner