
अनेक वर्षे त्यांनी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अमृत उद्योग समुहातील विविध सहकारी संस्थांमधील विविध पदे भुषविताना, संगमनेर तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम केले.
संगमनेर ः दिवंगत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांचे निष्ठावंत सहकारी, वारकरी सांप्रदायाचे पाईक, निवृत्ति महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ वर्पे ( वय 87 ), रा. चिकणी, ता. संगमनेर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
अनेक वर्षे त्यांनी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अमृत उद्योग समुहातील विविध सहकारी संस्थांमधील विविध पदे भुषविताना, संगमनेर तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम केले. तसेच आयुष्यभर वारकरी सांप्रदायाचा वारसा जपत त्यांनी निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ट्रस्टचे विश्वस्त पदही सुमारे 30 वर्ष सांभाळले.
निवृत्ती महाराज पालखी व पायी दिंडी समितीचे अध्यक्ष म्हणून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन व नियोजनात त्यांचा मोठा सहभाग असे. वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत ते स्वत: दुचाकी व चारचाकी वाहने चालवीत होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दुध संघाचे संचालक विलास वर्पे यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच अमृत उद्योग समूह व संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.