घरकुलाचे स्वप्न आले टप्प्यात, राहुरीसाठी सात कोटी रूपये वर्ग

विलास कुलकर्णी
Thursday, 8 October 2020

पालिकेच्या घरकुलाच्या पहिल्या प्रकल्पासाठी मंजूर 233 लाभार्थींना राज्य सरकारच्या एक लाख रुपये अनुदानापैकी प्रति लाभार्थी 40 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे 93 लाख रुपये अनुदान दीड वर्षांपूर्वी मिळाले होते. परंतु, केंद्र सरकारचे अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे घरकुल योजना रखडली.

राहुरी : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून पालिकेला प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पहिल्या प्रकल्पाच्या लाभार्थींसाठी केंद्र सरकारचे एक कोटी 39 लाख व राज्य सरकारचे एक कोटी 39 लाख, तसेच घरकुलाच्या दुसऱ्या प्रकल्पाच्या लाभार्थींसाठी राज्य सरकारचे चार कोटी 3 लाख रुपये, असे एकूण सहा कोटी 81 लाख रुपये अनुदान वर्ग झाले आहे. त्यामुळे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेला गती मिळेल, असे नगराध्यक्ष अनिता पोपळघट यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (घटक क्रमांक 4) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेतून पालिकेस दोन प्रकल्प अहवाल मंजूर झाले आहेत. पहिल्या प्रकल्पात 233 व दुसऱ्या प्रकल्पात 460 लाभार्थींचा समावेश आहे. घरकुलासाठी प्रती लाभार्थी अडीच लाख रुपये अनुदान मंजूर आहे. त्यात राज्य सरकारचे एक लाख व केंद्र सरकारचा वाटा दीड लाख रुपयांचा आहे. 

पालिकेच्या घरकुलाच्या पहिल्या प्रकल्पासाठी मंजूर 233 लाभार्थींना राज्य सरकारच्या एक लाख रुपये अनुदानापैकी प्रति लाभार्थी 40 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे 93 लाख रुपये अनुदान दीड वर्षांपूर्वी मिळाले होते. परंतु, केंद्र सरकारचे अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे घरकुल योजना रखडली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या प्रकल्पातील 233 लाभार्थींना राज्य सरकारचा उर्वरित 60 हजार रुपये प्रति लाभार्थी याप्रमाणे एक कोटी 39 लाख रुपये अनुदान वर्ग झाले.

केंद्र सरकारतर्फे प्रति लाभार्थी दीड लाख रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी, 60 हजार रुपये प्रति लाभार्थी प्रमाणे केंद्र सरकारचे एक कोटी 39 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले. 
घरकुलाच्या दुसऱ्या प्रकल्पातील 460 पैकी 403 लाभार्थींचे राज्य सरकारचे प्रति लाभार्थी एक लाख रुपयाप्रमाणे चार कोटी 3 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

उर्वरित 57 लाभार्थींचे अनुदान अद्याप मिळायचे आहे. केंद्र सरकारकडून दुसऱ्या प्रकल्पातील लाभार्थींसाठी अद्याप अनुदान मिळालेले नाही, असे पोपळघट यांनी सांगितले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven crore rupees for Gharkula

Tags
टॉपिकस
Topic Tags: