esakal | खळबळजनक ः अॉक्सीजन न मिळाल्याने नगरमध्ये सातजणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Another corona positive patient dies
खळबळजनक ः अॉक्सीजन न मिळाल्याने नगरमध्ये सातजणांचा मृत्यू
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. दिल्लीतच नव्हे तर नगरमध्येही अॉक्सीजनअभावी जीव जाऊ लागले आहेत. आज सकाळी अॉक्सीजन न मिळाल्याने तब्बल सातजणांना जीव गमवावा लागला. नगर शहरातील एका शहरात ही घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनही खडबडून जागे झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अॉक्सीजनसाठी जिल्ह्याचा प्राण तळमळला आहे. स्वयंसेवी महासंघाने अॉक्सीजनसाठी आंदोलन केले होते. मागील आठवड्यात पुण्यातील लोकांनी नगरचे टँकर अडवून धरले होते. एक टँकर शहरात येताच नादुरूस्त झाला. त्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच धावपळ करावी लागली होती. बहुतांशी डॉक्टर रूग्णांच्या नातेवाईकांना अॉक्सीजन सिलिंडर आणायला लावतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतो आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा प्रशासन अॉक्सीजन मोठ्या प्रमाणात आल्याचे सांगते आहे. काल ५० केएल टँकर अॉक्सीजन जिल्ह्यात आल्याचे सांगते आहे. दररोजची जिल्ह्याची गरज ६० केएलची गरज आहे. दररोज २० केएल अॉक्सीजन मिळत असतानाही एवढी गंभीर स्थिती उदभवली नव्हती. मात्र, ५० केएल अॉक्सीजन येऊनही लोकांना जीव का गमवावा लागला, याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आलेला अॉक्सीजनचे समन्यायी वाटप होत नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ही स्थिती उदभवल्याचे सांगितले जाते.

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

सात जणांना जीव गमावावा लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. त्यासाठी शहरातील बहुतांशी डॉक्टर उपस्थित आहेत. अॉक्सीजन तर मोठ्या प्रमाणात आहे. मग संबंधित लोकांना नेमका कशामुळे जीव गमवावा लागला, याबाबत तपास केला जात आहे. अॉक्सीजनचा सिलिंडर न मिळाल्याने मृत्यू झाला की संबंधित रूग्णालयातील अॉक्सीजन यंत्रणेत काही बिघाड झाला, हे चौकशीनंतरच कळू शकेल.