महापालिका बनले मलिद्याचे ठिकाण, सात अधिकारी, कर्मचारी अडकले

Seven officers and employees of the corporation were caught taking bribe
Seven officers and employees of the corporation were caught taking bribe

नगर ः महापालिकेत नैतिकतेचा कचरा झाला आहे. नागरिकांच्या हिताच्या योजना न आखणारे अधिकारी व पदाधिकारी "टक्‍केवारी'त मात्र आघाडीवर आहेत. महापालिकेत भ्रष्टाचारच शिष्टाचार झाल्याचे चित्र आहे. घनकचरा व्यवस्थापनप्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर यांच्या प्रकरणावरून हेच दिसते. 

गेल्या 18 वर्षांत महापालिकेतील सात अधिकारी- कर्मचारी लाचेच्या जाळ्यात सापडले. त्यांतील बहुतेक निर्दोष ठरले. त्यांपैकी काही जण आता महापालिकेतून उजळ माथ्याने निवृत्तही झाले. मात्र, यामुळे महापालिकेतील नैतिकता रसातळाला गेली. प्रत्येक शासकीय योजनेतून आपली पोळी कशी भाजता येईल, याचाच विचार येथे होतो की काय, अशी शंका येते. बरेच जण ठेकेदारांशी संगनमत करून उपठेकेदारी करीत आहेत. असे उपठेकेदार शोधण्याचे आव्हान जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर आहे. 

शहरातील घंटागाड्यांचे वजन योग्य होत नसल्याच्या तक्रारी आहेत. कचरा टनात, तर बांधकाम साहित्य ब्रासमध्ये मोजले जाते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे बांधकाम साहित्य उचलण्यासाठी ठेकेदाराला ब्रासऐवजी टनाच्या हिशेबात मोबदला मंजूर केला. त्याविरोधात स्थायी समितीत शिवसेना नगरसेवक विजय पठारे यांनी आवाज उठविला. मात्र, तरीही या कामास सभापतींनी मंजुरी दिली. हा अजब प्रस्तावही डॉ. पैठणकर यांनीच मांडला होता. 

सावेडी कचराडेपोच नडला 
सावेडी कचरा डेपोला सप्टेंबर 2019मध्ये लागलेली आग व आक्षेपार्ह कार्यपद्धतीमुळे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी डॉ. पैठणकर यांना निलंबित केले होते. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला. डॉ. पैठणकर निलंबित झालेले असतानाच, नगर शहर कचराकुंडीमुक्‍त झाले. स्वच्छता सर्वेक्षण अभियानात पहिल्यांदाच "थ्री-स्टार' मानांकन मिळाले. मात्र, श्रीकांत मायकलवार यांनी आयुक्‍तपदाचा पदभार सांभाळताच डॉ. पैठणकर पुन्हा सेवेत रुजू झाले. योगायोग म्हणजे, डॉ. पैठणकरांना सावेडी कचराडेपोतच लाच स्वीकारताना पकडले गेले. 

कचऱ्यात दडलंय काय? 
स्वच्छता अभियानाच्या नावाखाली केंद्र व राज्य सरकारकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखोंचा निधी येतो. शिवाय, कचऱ्यापासून खतनिर्मितीतूनही महापालिकेला उत्पन्न मिळते. त्यामुळे घनकचरा विभागावर लक्ष्मी प्रसन्न आहे. या विभागात ठेका देणे, बिले काढण्याच्या कामात गैरव्यवहाराचे आरोप झाले. या कचऱ्यातून मिळणाऱ्या लक्ष्मीसाठीच डॉ. पैठणकर यांना अडकविण्यात आल्याची चर्चा आहे. 

डॉ. राजूरकर यांच्याकडे पदभार 
महापालिका उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचा प्रभारी पदभार (अतिरिक्त) डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविला आहे. डॉ. राजूरकर बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात कार्यरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com