अहमदनगर : भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातातील चक्काचूर झालेली रिक्षा.

अहमदनगर : भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू

पोहेगाव - कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात पगारे वस्तीजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरने रिक्षाला दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. राजाबाई साहेबराव खरात (वय ६०, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५, रा. वावी, ता सिन्नर, जि. नाशिक), पूजा नानासाहेब गायकवाड (वय २०, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय २०, रा. चांदेकसारे), शैला शिवाजी खरात (वय ४२, रा. श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (वय ५२, रा. श्रीरामपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. रूपाली सागर राठोड (वय ४०, रा. सिन्नर, जि. नाशिक) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विलास साहेबराव खरात (वय ३४), कावेरी विलास खरात (वय ५, दोघे रा. चांदेकसारे), ध्रुव सागर राठोड (वय १७, रा. सिन्नर, जि. नाशिक) आणि मोटारसायकलवरील दिगंबर चौधरी (वय ४२), तसेच त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (वय १२) आणि कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय ४२, सर्व रा. पोहेगाव) हे जखमी झाले आहेत.

झगडे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने (पीबी ०५ एबी ४००६) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला कट मारण्याच्या नादात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाला (एमएच १७ एजे ९०५६) जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील सात जणांचा मृत्यू झाला. रिक्षामधील ३ प्रवासी आणि मोटारसायकलवरील तिघे, असे सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये २ महाविद्यालयीन विद्यार्थिनींचाही समावेश आहे. रिक्षामधून दहा जण प्रवास करीत होते. अपघातानंतर कंटेनरचालक दर्शनसिंग गजनसिंग (रा. पंजाब) हा नाशिकच्या दिशेने पळून चालला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यास झगडे फाटा येथून ताब्यात घेतले.

पती-पत्नीचा मृत्यू

या अपघातात शैला खरात व शिवाजी खरात या दाम्पत्याचा मृत्यू झाला. दोघे चांदेकसारे येथे नातेवाइकांकडे आले होते. घरी श्रीरामपूरला परतत असताना त्यांना मृत्यूने कवटाळले.

महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा अंत

पूजा गायकवाड व प्रगती होन या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा या अपघातात मृत्यू झाला. प्रगती होन ही कोपरगाव येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तर पूजा गायकवाड येवला येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

Web Title: Seven People Died In Awful Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top