शरद पवार, उद्धव ठाकरेंमुळे पुणे बाजार समिती कार्यक्षमपणे सुरु

शांताराम काळे
Tuesday, 20 October 2020

लॉकडाऊन काळात देशातील सर्व बाजार समित्या बंद राहिल्या. पण पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र ही केवळ एक आणि एकच बाजार समिती कार्यक्षम पद्धतीने सुरु राहिली.

अकोले (अहमदनगर) : लॉकडाऊन काळात देशातील सर्व बाजार समित्या बंद राहिल्या. पण पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र ही केवळ एक आणि एकच बाजार समिती कार्यक्षम पद्धतीने सुरु राहिली. याबाबत सातत्याने शरद पवार, अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेऊन इतरांना त्यासाठी पथदर्शक, असे काम होईल असा आपल्याला सल्ला दिला होता.

त्याचे तंतोतंत पालन आपण केले असेही त्यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. 'सिस्टम डेवलपमेंट' यावर आपला विश्वास आहे, अशी पुस्ती सेवा निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख यांनी जोडली.

पुणे येथील राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी केलेल्या आरोपाबद्दल ते बोलत होते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाच्या काळामध्ये शेवटी आपल्यावर विनाकारण हे आरोप करण्यात आले. त्यात गैरव्यवहार झाल्याचा किंबहूना गैरव्यहवाराचा सूर काही माध्यमांनी उमटवला. पण याच्या संदर्भातील सर्व खुलासेवार माहिती आपण ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित दादा पवार यांच्याकडे सादर केली. 

या संदर्भात अजूनही आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्यावर झालेले आरोप हे सहेतुक झालेले असून आपण त्यामुळे निश्चित दुखावलो असल्याचा त्यांनी यावेळेस अंतर्मनाचा आवाज स्पष्ट केला. हे स्पष्टीकरण देताना त्यांना गलबलून आलेल्या भावना लपवता आल्या नाही. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली आणि तब्बल चार तास चाललेल्या या परिसंवादामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar started good work of Pune Agricultural Produce Market Committee