
अन्न धान्याच्या बाबतीत आयातीवर जगणाऱ्या भारत देशाला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे कार्य माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : अन्न धान्याच्या बाबतीत आयातीवर जगणाऱ्या भारत देशाला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे कार्य माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांनी केले. देशाचे कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांनी तेव्हा दोनच वर्षात भारत देश साखर, दूध, गहू, तांदूळ, कापूस उत्पादनात पहिल्या क्रमांकांचा देश ठरविला. तसेच फळभाज्यांच्या बाबतीतही त्यांनी मोठी क्रांती घडून आणली.
रोजगार हमीच्या योजनेतुन त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी व समाज परिवर्तनासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे त्यांच्याकडे कृतीकर्ते, कार्यकर्ते म्हणून पाहिले जाते. हरितक्रांती घडविणारा एकमेव लोकनेता म्हणून शरदचंद्र पवार यांची ओळख असल्याचे प्रतिपादन अॅड. राम कांडगे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील बोरावके महाविद्यालयात रयतचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रयत शैक्षणिक संकुलातर्फे आयोजित व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून अॅड. राम कांडगे बोलत होते. आजच्या तरुणपिढीने कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जपला पाहिजे. यशाला गवसणी घालण्यासाठी तरुणांना थोर व्यक्तींचे कार्य प्रेरणा देत असल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रारंभी प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अॅड. कांडगे म्हणाले, पवार म्हणजे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला दिले आहे. त्यांनी कला, क्रीडा, साहित्य, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा उल्लेखनीय ठसा उमटविला. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या तालमीत तयार झालेले पवार समाजाच्या परिवर्तनासाठी अविरत कार्यरत आहे. त्यांनी देशाला पुरोगामी विचारांचा वारसा दिला. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदावर काम केले.
रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत देखील त्यांचे मोठे योगदान आहे. देशाला पवारांसारखा अष्टपैलू हिरा मिळाल्याने विकासात्मक दिशेने देशाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम, अॅड. विजय बनकर, डॉ. रविंद्र जगधने, प्राचार्य डॉ. लक्ष्मण भोर, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे उपस्थित होते. प्रा. सुजाता पोखरकर यांनी आभार मानले. तर प्रा. मनिषा निफाडे यांनी सुत्रसंचालन केले.
संपादन : अशोक मुरुमकर