esakal | शेवगाव : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीघांविरुध्द गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शेवगाव : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीघांविरुध्द गुन्हा दाखल

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरुन चारचाकी गाडीतुन पळवून नेत एका वयोवृध्दास मारहाण व छळ करुन त्यांना गळफास घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गदेवाडी ता. शेवगाव येथील तीन जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या मयताचे नाव विनायक किसन मडके (वय-६५) राहणार गदेवाडी ता. शेवगाव असे असून मयताचा मुलगा तुळशीराम विनायक मडके (वय-३०) यांच्या फिर्यादीवरुन मुकेश दत्तात्रय मानकर (वय-), रुपेश दत्तात्रय मानकर, मच्छिंद्र एकनाथ धनवडे यांच्या विरुध्द मानसिक व शारिरीक छळ करुन व त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व इतर कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: अकलूजकरांनी केले गणरायाचे उत्साहात स्वागत

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गदेवाडी येथील रहिवाशी असलेले विनायक मडके हे आठ दिवसापूर्वी स्वत:च्या मालकीच्या घोडयावरुन शेतात जात असतांना गावातील मुकेश व रुपेश मानकर, मच्छिंद्र धनवडे यांनी त्यांच्या चारचाकी २२२३ ( पूर्ण नंबर माहिती नाही ) या गाडीने हुलकावणी देत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दुस-या दिवशी वडील गावात गेले असता या तिघांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. वडीलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्यांनी माराहण केली.

तु आम्हाला पैसे दिले नाहीत तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. वडीलांनी घरी येवून आम्हास हा प्रकार सांगितला. ता.९ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास या तिघांनी घरी येवून वडीलांना जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी गाडीतून पळून नेले. त्यानंतर माझ्या मोबाईलवर फोन करुन रुपेश मानकर याने तुझ्या वडीलांना जीवंत सोडणार नाही असे म्हणत मला देखील शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी फोनवर वडीलांना मारहाण करत असल्याने त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर वडीलांचा शोध घेण्यासाठी आम्ही गेलो असता गदेवाडी गावाच्या शिवारास मच्छिंद्र धनवडे यांच्या मालकीच्या हाँटेल सुयोग समोर त्यांची गाडी उभी होती. हाँटेलकडे जावून पाहीले असता हे तिघेजण वडीलांना मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यानंतर मी घरी येवून मोठा भाऊ गोरख यास हाँटेलवर घेवून गेलो. तेव्हा वडीलांना मारहाण करणारे तेथून निघून गेले होते.

हेही वाचा: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

वडीलांचा आसपास शोध घेतला असता हाँटेलच्या पाठीमागील शेतामध्ये बोरीच्या झाडाला ते गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत दिसले. आम्ही त्यांना तातडीने खाली उतरवून घेवून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता ते मयत झाल्याचे डाँक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुकेश, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे या तिघांविरुध्द वडीलास मारहाण करुन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट : या प्रकरणांतील दोषी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मयत विनायक मडके यांच्या नातेवाईकांनी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन केल्यानंतरही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत मृतदेह शेवगाव येथील ग्रामिण रुग्णालयातच होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेह गदेवाडी येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आला.

loading image
go to top