esakal | अकलूजकरांनी केले गणरायाचे उत्साहात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

अकलूजकरांनी केले गणरायाचे उत्साहात स्वागत

अकलूजकरांनी केले गणरायाचे उत्साहात स्वागत

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज : कोरोनाची तमा न बाळगता अकलूजकरांनी घरगुती गणपतीच्या स्थापना मोठ्या उत्साहाने केल्या. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोणताही आरास वा मिरवणूक न काढता कोरोनाबाबतचे नियम पाळत अत्यंत साध्या व धार्मिक पद्धतीने गणेशाची स्थापना केली.

हेही वाचा: 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पंढरपुरात गणरायाचे स्वागत

अकलूज शहरात लहानमोठी सुमारे 100 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्व मंडळामध्ये सुसूत्रता व एकोपा असावा यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची स्थापना तत्कालीन सरपंच जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली. या मंडळाच्यावतीने आरास, मिरवणूक याच्या स्पर्धा घेत बक्षिसे दिली जातात.

बक्षिसे देताना मंडळाने सामाजिक, देशभक्ती, शैक्षणिक, पर्यावरण, भ्रूणहत्या विरोधी अशा प्रबोधन करणाऱ्या विषयांचा आरास, मिरवणुकीतील पारंपारिक वाद्यांचा वापर, दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी शिस्तबद्ध नियोजन आदींचा प्राधान्याने विचार होत होता. त्यामुळे गणपतीसमोर अतिशय चांगली आरास केली जायची.

हेही वाचा: आले गणराय! स्वागतासाठी रमले बच्चेकंपनीसह कुटुंबीयही

मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळे यामध्ये खंड पडलेला आहे. सर्व मोठ्या सार्वजनिक मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने व धार्मिक रितीनुसार गणेश स्थापना केली. शाळा बंद असल्याने घरातच असणारी चिमुकली मंडळी मात्र आज गणेश आगमनानिमित्त बाहेर पडलेली दिसत होती.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात या चिमुकल्यांबरोबर तरूणाईने गणपतीचे उत्साहात स्वागत केले. यात तरूण मुलींची संख्या लक्षणीय होती. या प्रसंगी नाकातोंडावर असलेला मास्क अडचणीचा ठरत असला तरी काही पालक तो हटविण्यास मज्जाव करताना दिसत होते.

गर्दी तरीही अपेक्षित उलाढाल नाही

दरवर्षी अकलूज शहरात हनुमान मंदिर व विजय चौक या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीकरीता ठेवल्या जातात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिर बंद असल्याने फक्त जुने एसटी स्थानक ते विजय चौक या परिसरातच गणेश मूर्ती विक्रीस ठेवल्या गेल्या. या परिसरात सकाळपासून थोडीफार गर्दी होती.

गणेश मूर्तीबरोबरच कुंची, आसन, पाट व थर्मोकॉलची सुशोभित मकरमंदिरे व इतर आरासाचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती. परंतु, बहुतांशी गणेश भक्तांनी फक्त गणेशमूर्तीच घेत इतर, साहित्य विकणाऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकंदर कोरोनाचे निर्बंध शिथिल असूनसुद्धा बाजारपेठेत गर्दी दिसून आली असली तरी अपेक्षित उलाढाल झाली नाही.

loading image
go to top