शेवगावात कचरासंकलनाची निविदाच निघेना म्हणून झालंय असं

In Shevgaon, the tender for garbage collection was not issued
In Shevgaon, the tender for garbage collection was not issued

शेवगाव : शहरातील कचरासंकलनाचा ठेका संपून महिना झाला तरी पुढील निविदाप्रक्रिया झाली नाही. त्यामुळे कचरासंकलनाची धुरा पुन्हा एकदा पालिका कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव, तसेच साचलेल्या कचऱ्याची सुटलेली दुर्गंधी, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

शहरातील कचरासंकलन, व्यवस्थापन, खतनिर्मिती, जनजागृती व जंतुनाशक फवारणी आदी कामांचा ठेका पालिकेने 89 लाख रुपयांना जळगाव येथील पेडकाईमाता बहुउद्देशीय संस्थेला एक वर्षासाठी दिला होता. त्यानुसार संस्थेकडून सहा घंटागाड्या, दोन ट्रॅक्‍टरच्या मदतीने शहरात कचरासंकलन होत होते.

या बाबतही अनेकदा तक्रारी झाल्या असल्या, तरी बऱ्याच अंशी कचरा उचलला जात असल्याने शहर बऱ्यापैकी स्वच्छ होत होते. या ठेक्‍याची मुदत एप्रिलमध्ये संपली. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केल्याने याच संस्थेला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्याची मुदतही आठ जुलैला संपली. त्यामुळे संबंधित एजन्सीने आपले काम थांबविल्याने शहरातील कचरासंकलनाचे काम अनेक दिवसांनंतर पुन्हा पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आले. 

पालिका कर्मचाऱ्यांकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय सर्वेक्षण व संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची जबाबदारी दिली आहे. शहराची लोकसंख्या, पालिकेचे कर्मचारी व वाहनांची अपुरी संख्या यांचा विचार करता, शहरातील स्वच्छता सांभाळून हे काम करणे कठीण आहे. कर्मचाऱ्यांवर शहरातील स्वच्छतेच्या कामाचा ताण आला आहे. त्यामुळे शहरात नियमित कचरासंकलन केले जात नाही. 

गेवराई रस्त्याच्या डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातून या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसाने शहरातील रस्ते चिखलांनी माखले आहेत. बेसुमार वाढलेले गवत आणि त्यात अडकलेल्या कचरा यांची भर पडत आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरात नियमित स्वच्छता होणे आवश्‍यक आहे. 

अशी असेल नवी निविदा : शहरातील कचरासंकलन, व्यवस्थापन, खतनिर्मिती, जनजागृती, औषधफवारणी, या पूर्वीच्या कामांसह शौचालय स्वच्छता, घंटागाड्यांसाठी चालक, सहायक व व्यवस्थापन कामासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याच्या कामाचा समावेश. त्यासाठी एक कोटी 43 लाखांच्या वार्षिक खर्चाची निविदा आहे. 


कचरासंकलनासाठी काढण्यात येणारी निविदाप्रक्रिया प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे. मंजुरी मिळताच कार्यारंभ आदेश काढण्यात येईल. 
- अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी, शेवगाव पालिका 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com