नगर जिल्हा अवैध गुटखाप्रकरण : शिर्डी पोलिसांकडून दोघे ताब्यात

गौरव साळुंके
Saturday, 7 November 2020

एकलहरे येथील अवैध गुटखाप्रकरणी शिर्डी पोलिसांनी संशयित आरोपी अन्सार शेख आणि अरुण गांगुर्डे या दोघांना एकलहरे येथून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील एकलहरे येथील अवैध गुटखाप्रकरणी शिर्डी पोलिसांनी संशयित आरोपी अन्सार शेख आणि अरुण गांगुर्डे या दोघांना एकलहरे येथून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिली. 

तालुक्‍यातील एकलहरे परिसरातील आठवडी शिवारात पत्राच्या गोदामातून शहर पोलिसांनी लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला होता. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन दिवसांनंतर पोलिसांनी पुन्हा त्याच परिसरात अवैध गुटखा जप्त केला होता. तसेच, निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथून अवैध गुटखा आणि चार वाहने जप्त करून तत्कालीन पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी कारवाई केली होती. विविध ठिकाणी छापे घालून अवैध गुटखा साठ्यावर केलेली कारवाई वादग्रस्त ठरल्याने, या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलिसांकडे सोपविला होता. 

तपास करून पोलिसांनी एकलहरे, निमगाव निघोज, लोणी येथून संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. संबंधित आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यातील दोन आरोपी पसार होते. त्यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना जामीन मंजूरही झाला होता. अवैध गुटखा प्रकरणाचा तपास सुरू असताना शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काल अन्सार शेख आणि अरुण गांगुर्डे यांना एकलहरे येथून ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सातव यांनी दिली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi police arrested two persons in Shrirampur taluka