
शिर्डी : हरीच्या दारी रंगले राजकारणातले वारकरी
शिर्डी : पावणेदोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहानिमित्त गोदाकाठच्या कोकमठाणात वैष्णवांचा मेळा भरला अन् भक्तीचा मळा फुलला. जशी गर्दी दाटली, तशी दिग्गज राजकारण्यांची लगबगदेखील सुरू झाली. काल (मंगळवारी) पहिल्याच दिवशी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे यांनी एकमेकांशेजारी बसून महंत रामगिरी महाराजांच्या रथाचे सारथ्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हे दोघेही नेते सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आहेत. एका अर्थाने ते या वारकऱ्यांच्या महाकुंभाच्या आयोजनाचे सारथीदेखील आहेत, हे कालच्या त्यांच्या सारथ्यावरून दिसून आले. रोज लाखोंची गर्दी आणि सोबतीला राजकारणातील दिग्गज दर्दी, हे या सप्ताहाचे फार पूर्वींपासूनचे वैशिष्ट्य राहिले आहे.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरात हे दोन्ही एका पक्षात आणि एका मंत्रिमंडळात होते तेव्हापासूनचे प्रतिस्पर्धी आहेत. या हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनाला अक्षरशः लाखो भाविक जमतात. त्यांच्या साक्षीने हे दोन मातब्बर नेते व्यासपीठावर येऊन हरीच्या नावे हमखास फुगडी खेळतात.
या दोघांनीही आपापल्या मतदारसंघांत यापूर्वी या सप्ताहाचे भव्यदिव्य आयोजन केले. या सप्ताहात हरीच्या नावे भक्तीचा मळा फुलतो. त्यातून लोकप्रियतेची आणि आपुलकीची चार फुले सहज गोळा करता येतात. मतांची बेगमी आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करता येते. त्यामुळे राजकारणातले हे दिग्गज वारकरी हरीच्या दरबारात दान करणे अन् लीन होणे पसंत करतात.
माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे, माजी खासदार दिवंगत शंकरराव काळे, माजी आमदार दिवंगत शंकरराव कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गंगापूरचे आमदार रामकृष्णबाबा पाटील, खासदार साहेबराव पाटील डोणगावकर, वैजापूरचे माजी
आमदार आर. एम. वाणी, विद्यमान आमदार रमेश बोरनारे, श्रीरामपूरचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आजवर या हरिनाम सप्ताहाचे कधी ना कधी आयोजन केले, अथवा त्यात हिरीरिने भाग घेतला आहे
तीन जिल्ह्यांच्या सीमाभागावर प्रभाव
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि नाशिक जिल्ह्यातील येवला या तालुक्यांतील भाविकांवर आणि पर्यायाने तेथील नेत्यांवर या सप्ताहाचा मोठा प्रभाव आहे.
Web Title: Shirdi Tradition Participation Political Leader
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..