esakal | कर्डिलेंनी केली खासदार सुजय विखेंची पाठराखण

बोलून बातमी शोधा

शिवाजीराव कर्डिले-सुजय विखे पाटील
कर्डिलेंनी केली खासदार सुजय विखेंची पाठराखण
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः ""रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनबाबत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांकडून बेताल आरोप होत आहेत. त्याबाबत न्यायालय योग्य तो निर्णय देईल; परंतु कोरोनाच्या कठीण काळात विरोधकांनी राजकारण करू नये. आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते डॉ. विखेंच्या पाठीशी आहोत,'' अशी भूमिका भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मांडली.

नगर जिल्ह्यात बेकायदा रेमडेसिव्हिर आणल्याचे कारण देऊन सध्या खासदार विखे पाटील यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहे. याबाबत कर्डिले यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने "सकाळ'शी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, ""सध्या माणसे जगविणे महत्त्वाचे आहे. जवळची माणसे सोडून जाताना प्रत्येक कुटुंब रोज हळहळत आहे. रेमडेसिव्हिर, ऑक्‍सिजन, बेडसाठी कार्यकर्त्यांचे फोन सुरूच आहेत. प्रत्येकाचे मन विषण्ण झाले आहे. अशा स्थितीत राजकीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी शक्‍य तेवढी मदत करून लोकांना आधार द्यावा.

या महामारीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत राजकारण करू नये. डॉ. विखेंनी रेमडेसिव्हिर कुठून आणले, कसे आणले, यापेक्षा ते काही तरी प्रयत्न करीत आहेत, हे महत्त्वाचे आहे. याबाबत योग्य-अयोग्य ते न्यायालय ठरवील; परंतु त्यांच्यावर आरोप करू नयेत.'' आम्ही विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत; प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा कर्डिले यांनी विरोधकांना दिला आहे.