शिवराज पाटील यांची नवी मुंबईत सिडकोवर नियुक्ती

दौलत झावरे
Thursday, 27 August 2020

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची नवी मुंबईत "सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.

नगर : अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची नवी मुंबईत "सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. मागील आठ दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा होती. बदलीचा आदेश प्रशासनाला आज प्राप्त झाला. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.
नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवराज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांसह शाळांना भेटी देऊन पाहणी केली.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अतिक्रमणे हटवून सर्व जागा पुन्हा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यासाठी विशेष लक्ष दिले. जिल्हा परिषदेच्या जुन्या वास्तूला गतवैभवासाठी निधी आणण्याकरिता प्रयत्न केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीही त्यांनी विशेष लक्ष घातले होते. कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या करून त्यांनी राज्यात नवा आदर्श निर्माण केला.

ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर ग्रामपंचायतींना कारवाई करता यावी, यासाठी ग्रामपंचायत कायद्याच्या उपविधीत दुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताळताना यशस्वी भूमिका निभावून, स्वतःही कोरोनाविरोधात यशस्वी लढा देत त्याला हरविले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivraj Patil appointed to CIDCO in Navi Mumbai