esakal | कोपरगाव नगरपालिकेत शिवसेनेचा राडा; उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena office bearers vandalized Office

कोपरगाव नगरपालिकेत शिवसेनेचा राडा; उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोपरगाव (जि. नगर) : अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) नगरपालिकेतील उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली, तसेच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (shivsena-office-bearers-vandalized-the-office-of-kopargaon-municipality-official)

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पूनम थिएटरसमोरील मोकळ्या जागेत शिवसेनेचे उपशहर प्रमुख बालाजी गोर्डे यांनी टपरी उभारली होती. ही टपरी पालिकेच्या पथकाने बुधवारी (ता. २१) रात्री ११ वाजता जेसीबीच्या साह्याने काढली. पालिकेने केवळ आपल्याच पदाधिकाऱ्याची टपरी काढल्याच्या राग मनात धरून शिवसेनेचे गटनेते व माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागूल यांनी आपल्या साथीदारांसह आज सकाळी ११ वाजता पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयाची व उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्या कार्यालयाची तोडफोड करून आरडाओरड करत शिवीगाळ केली. तसेच गोर्डे यांना मारहाण केली.

दरम्यान, मारहाणीच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बागूल, नगरसेवक कैलास द्वारकानाथ जाधव, सनी रमेश वाघ, उपशहरप्रमुख बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे व आशिष निळंक यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करणे, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

हेही वाचा: नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

तर शहराला वाली कोण

दरम्यान, नगरसेवकांनीच जर शहरातील अतिक्रमणे वाढण्यास प्रोत्साहन दिले, तसेच ही अतिक्रमणे काढल्यावर तोडफोड केली, तर शहराला वाली कोण, असा सवाल सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

टपरी मध्यरात्री काढून छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे नुकसान केले. त्याचा जाब विचारण्यासाठी पालिकेत गेलो होतो. मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक न उत्तरे न दिल्याने आम्ही आमचा हिसका दाखवला. - योगेश बागूल, शिवसेना गटनेते

(shivsena-office-bearers-vandalized-the-office-of-kopargaon-municipality-official)

हेही वाचा: शिर्डीत साईभक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ

loading image