esakal | नुकसानग्रस्त शिवाराची आमदार लहु कानडे यांनी केली बैलगाडीतुन पहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Shrirampur taluka MLA inspect crop damaged due to torrential rains

परतीच्या पावसाने झोडपल्याने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्णक्षमतेने भरला आहे.

नुकसानग्रस्त शिवाराची आमदार लहु कानडे यांनी केली बैलगाडीतुन पहाणी

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : परतीच्या पावसाने झोडपल्याने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्णक्षमतेने भरला आहे. तलावातील पाणीसाठ्यामुळे नायगावसह जाफराबाद शिवारातील खरीपाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बैलगाडीतुन प्रवास दौरा करत नुकसानग्रस्त शिवाराची पहाणी करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याची, ग्वाही आमदार लहु कानडे यांनी दिली. तालुक्यातील गोदावरी नदीपट्यातील नुकसानग्रस्त भागाचा आमदार कानडे यांनी आज बैलगाडीतुन प्रवास करुन पहाणी दौरा केला. 

दरम्यान, आमदार कानडे श्रीरामपूर येथुन सकाळी गोदावरी नदी परिसरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना वैजापूर-श्रीरामपूर खडेमय रस्त्याचा सामना करावा लागला. रस्त्यावरील खड्डे चुकवत अखेर त्यांनी नायगाव शिवार गाठले. अतिपावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार कानडे यांनी बैलगाडीतुन प्रवास केला. पावसामुळे प्रमुख रस्त्यासह शिवार रस्त्यावर खड्डे पडले आहेत. चिखलमय शिवार रस्त्यावरुन बैलगाडीतुन प्रवास करत आमदारांनी बाधित पिकांची पहाणी केली. नुकसानीचा आढाव घेत नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने भरपाई मिळवुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जेष्ठनेते इंद्रभान थोरात, सतिश बोर्डे यांनी बैलगाडीतुन नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी केली. दौरयावरील कृषी सहायक अनिल शेजुळ, तलाठी एन. व्ही. नागापुरे, ग्रामसेवक मनोज लहारे, बाबासाहेब कोळसे, गोविंद वाघ, राजेंद्र औताडे, अशोक गायकवाड, जुनेद पटेल, माजी सरपंच ज्ञानेश्वर बुचुडे यांनी बैलगाडी मागे खडेमय रस्त्याने प्रवास केला. 

यंदा जाफराबाद येथील साठवण तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार प्रशांत पाटील आणि प्रांताधिकारी अनिल पवार यांनी नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याच्या सुचना तलाठी आणि ग्रामसेवकांना दिल्या. अतिपावसामुळे खराब झालेल्या सोयाबीन, कापुस, मका, ऊस, बाजरी पिकांची आमदार कानडे यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन नुकसान भरपाईची ग्वाही दिली. परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातले असुन गोदावरी नदीपट्यातील शेकडो एकर खरीपाचे पिक बाधित झाले आहे. सरकारने शेतकर्यांना तातडीने भरीव मदत देण्याची मागणी नदी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर