चिचोंडी पाटीलमध्ये भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दत्ता इंगळे
Friday, 10 July 2020

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविले होते. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नगर तालुका ः चिचोंडी पाटील येथे आज दुपारी तीनच्या सुमारास जनावरे चारण्यासाठी गेलेल्या चुलत भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. तुषार राजेंद्र पवार (वय 12) व संस्कृती संदीप पवार (वय 7) अशी त्यांची नावे आहेत.

चिचोंडी पाटील- नांदूर विठ्ठलाचे रस्त्यावरील पवार पट्टा परिसरात पवार यांचे कुटुंब राहते. तुषार व संस्कृती ही चुलत भावंडे आज दुपारी जनावरे चारण्यासाठी पठारावर गेली होती.

हेही वाचा - भाजपनेत्यांमुळे युजीसीची भाषा बदलली

दुपारच्या वेळी ते तेथील शेततळ्याकडे गेले. तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत माहिती मिळताच, तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविले होते. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चिचोंडी पाटील सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रघुनाथ पवार यांचा तुषार हा मुलगा असून, त्यांचे बंधू संदीप पवार यांची संस्कृती मुलगी होती.

यंदाच्या पावसाळ्यात अकोला, कोपरगाव, पाथर्डी, तसेच कर्जत तालुक्यात शेततळ्या किंवा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. सर्वात दुर्देवी घटना श्रीगोंदा तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी घडली. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. ते परप्रांतीय होते. नगर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

शेततळ्यात बुडण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. कृषी विभागाने शेततळ्याभोवती संरक्षक कठडे उभारावे यासाठी आदेश काढला आहे. परंतु तो पाळला जात नाही.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siblings drown in farm at Chichondi Patil