जामखेडमध्ये आहे सिद्धिविनायक, करतो भक्तांचे दुःखहरण

प्रा.डॉ. संतोष यादव
Friday, 28 August 2020

जामखेडमध्ये ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या सिद्धिविनायकाचे मंदिर भक्तांना आकर्षित करणारे आहे. कोर्ट गल्ली परिसरात, लोकमान्य वाचनालयासमोर हे मंदिर उत्तराभिमुख आहे. गेल्या कित्तेक वर्षापासून या गणेशाची पूजाअर्चा कुलकर्णी कुटुंबियांकडून नित्यनियमाने होते.  

नगर ः गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. काही ठिकाणी मानाचे गणपती आहेत. परंतु राज्यात काही ठिकाणच्या गणेशोत्सवांना मोठी परंपरा आहे. तेथील गणेशमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

बीड, उस्मानाबाद, सोलापूर अशा जिल्ह्याच्या सरहद्दी जामखेड  तालुक्याला लाभल्या आहेत. बाजरपेठेत जामखेडचे नाव लौकिक आजही कायम आहे. एक ऐतिहासिक तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे.  

मराठ्यांची शेवटी विजयी लढाई खर्डा या ठिकाणी 1795 साली झाली. त्याआधी निंबाळकरांनी 1745 ला किल्ल्याची पायाभरणी केली. त्या आशयाचा शिलालेख किल्ल्यात आजही आहे. या निंबाळकरांचे अनेक नातलग त्यावेळी जामखेडच्या सोनार गल्लीत वास्तव्यास होते, असे सांगतात. त्यापैकी अनेक वाड्याचे अवशेष या भागात आजही पाहावयास मिळतात.  गणेशाची स्थापना निंबाळकरांनी केली अशी आख्यायिका आहे.

हेही वाचा - पाथर्डीच्या माजी सभापतींना जामीन मंजूर

जामखेडमध्ये ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या सिद्धिविनायकाचे मंदिर भक्तांना आकर्षित करणारे आहे. कोर्ट गल्ली परिसरात, लोकमान्य वाचनालयासमोर हे मंदिर उत्तराभिमुख आहे. गेल्या कित्तेक वर्षापासून या गणेशाची पूजाअर्चा कुलकर्णी कुटुंबियांकडून नित्यनियमाने होते.  

ही गणेश मूर्ती स्वयंभू  एकपाषाणी असून या मूर्तीचे बरेचसे साम्य सिद्धिविनायक गणपती (सिद्धटेक प्रमाणे ) आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा सिद्धिविनायक अशी या गणेशाची ख्याती सर्वदूर आहे. कोणत्याही मंगलप्रसंगी भक्त प्रथम येथेच नारळ चढवून मंगल कार्यास प्रारंभ करतात. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. 

अंदाजे तीनशे वर्षपूर्वीचे बांधकाम असावे. मंदिरातील फरशी ही दगडी चिऱ्यांची आहे. मंदिर छोटे खाणी असून कळसाचा आकार घुमटाकार चुना विटांनी बांधलेला आहे. गणेशमूर्ती शेजारी  शिवलिंग ठेवलेले आहे, तर गणपतीच्या उजव्या बाजूला दत्ताची मूर्ती आहे. दर चतुर्थीला येथे भक्त विशेष गर्दी करतात.   सर्व धर्मीय गणेश उत्सवात सहभागी होऊन सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतात.  

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhivinayak ganesh is in Jamkhed