साहेब काही तरी बघा, मोदींचे पैसे येईनात...

विलास कुलकर्णी
मंगळवार, 30 जून 2020

शेतकऱ्यांनी कागदपत्रांमधील व ऑनलाइन चुकांची दुरुस्ती केली. परंतु सहा महिने ते एक वर्ष होऊनही बॅंक खात्यावर योजनेच्या मदतीचा एकही हप्ता जमा झाला नाही.

राहुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत. योजनेसाठी आवश्‍यक कागदपत्रे देऊन, ऑनलाइन माहिती भरताना झालेल्या चुका दुरुस्त करूनही योजनेचा लाभ मिळाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ही योजना ग्रामीण भागात पंतप्रधान मोदी यांच्या नावाने अोळखली जाते. त्यामुळे मोदींचे पैसे आले नाही, अशी चर्चा शेतकर्यांत असते. किंवा ज्यांचे पैसे जमा झाले आहेत, ते मोदींचे पैसे बँकेत आले, असे एकमेकांना  सांगत असतात.

केंद्र सरकारतर्फे शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये मदत दिली जाते. एक डिसेंबर 2018 पासून ही योजना कार्यान्वित झाली. शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे व ऑनलाइन माहिती भरताना चुका झाल्या. नावातील स्पेलिंग, बॅंकेचे नाव, बॅंकेचा खाते क्रमांक, आधार कार्डवरील नाव, आधार कार्डचा नंबर यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ऑनलाइन कामात चुका झाल्या आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना योजनेच्या मदतीपासून वंचित राहावे लागले.

हेही वाचा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संंबंध...नगरच्या महापालिकेत आगडोंब

शेतकऱ्यांनी कागदपत्रांमधील व ऑनलाइन चुकांची दुरुस्ती केली. परंतु सहा महिने ते एक वर्ष होऊनही बॅंक खात्यावर योजनेच्या मदतीचा एकही हप्ता जमा झाला नाही. शेतकऱ्यांनी ऑनलाइन स्वतःची माहिती पाहिल्यावर त्यावर "पेमेंट स्टॉप बाय स्टेट लेव्हल' असा शेरा दिसतो. त्यामुळे केंद्र सरकारने निधी दिला. परंतु राज्यस्तरावर निधी थांबविला, असा शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरला आहे. 

 

"पिंप्री अवघड येथे माझ्यासह 42 शेतकऱ्यांनी एक वर्षापूर्वी ऑनलाइन चुकांची दुरुस्ती केली. परंतु अद्यापपावेतो पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा मदतीचा एकही हप्ता बॅंकेत जमा झाला नाही. राज्यस्तरावर निधी थांबविल्याचे ऑनलाइनवर दिसते. 
- नारायण दोंड, शेतकरी, पिंप्री अवघड 

 
संगणकावर माहिती भरताना व कागदपत्रांमध्ये चुका आढळल्याने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची मदत लाभार्थींच्या बॅंक खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे "पेमेंट स्टॉप बाय स्टेट लेव्हल' असा शेरा आहे. आतापर्यंत 19 हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाइन चुकांची दुरुस्ती केली. टप्प्या-टप्प्याने निधी जमा होत आहे. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir, look at something, Modi's money will not come ...

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: