शिवार आबादी आबाद! प्रवरा नदीवर बंधाऱ्यांची मालिका; मुबलक पाणीसाठा 

सुहास वैद्य
Saturday, 2 January 2021

प्रवरा नदीकाठच्या आश्वी ते गळनिंब या सुमारे 30 किलोमीटरच्या हजारो एकरांवरील शेतीसाठी वरदान ठरलेल्या 6 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात यंदा मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने बळीराजा सुखावल्याचे दिलासादायक चित्र आहे.

कोल्हार (अहमदनगर) : प्रवरा नदीकाठच्या आश्वी ते गळनिंब या सुमारे 30 किलोमीटरच्या हजारो एकरांवरील शेतीसाठी वरदान ठरलेल्या 6 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात यंदा मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने बळीराजा सुखावल्याचे दिलासादायक चित्र आहे. पुरेशा पाण्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील टंचाईची चिंता राहिलेली नाही. 

प्रवरा नदीवरील ओझर ते मध्यमेश्वरपर्यंतच्या बंधाऱ्यात सुमारे 1225 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. पैकी प्रवरा परिसरातील आश्वी ते गळलिंब या 6 बंधाऱ्यांमध्ये आजअखेर 285.80 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. राज्य सरकारने आश्वी, चणेगाव, रामपूर, कोल्हार, मांडवे, गळलिंब येथे कोल्हापूर पद्धतीच्या 6 बंधाऱ्यांची मालिका प्रवरा परिसरात उभी केली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाण्याचा शाश्‍वत आधार मिळाला. नदीला आलेल्या पुरामुळे अनेकदा बंधाऱ्यांचे नुकसान झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडला. प्रवरा पात्रातील बंधाऱ्यातील पाण्यावर हजारो एकर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा बंधारे भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बंधाऱ्यातील पाण्यामुळे रब्बीची चिंता राहिलेली नाही. साधारणपणे उन्हाळाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रवरा नदीतील सर्व उपबंधारे धरणातील पाण्यातून पुन्हा भरून देण्याचे नियोजन आहे. 

प्रवरेकाठी सर्वाधिक क्षेत्र उसाचे असून, त्याखालोखाल गहू, सोयाबीन, कपाशी, घास, मका आदी पिके बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रवरा नदीत पूर्वी क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण जास्त होते. बंधाऱ्याचे निर्मितीमुळे ऊस, जनावरांच्या चाऱ्यासाठी या पाण्याचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला. बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात घासाचे पीक सर्वाधिक असल्यामुळे दूध धंद्यात वाढ झाली. 

पाणीप्रश्‍नाबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील नेहमी जागरुक असतात. दरवर्षी पाण्याच्या उपलब्धतेनुसार बंधाऱ्यात प्राधान्याने पाणी साठविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून नियोजन करतात. त्याचा फायदा प्रवरेकाठच्या शेतकऱ्यांना होतो. 
- सुनील के. शिंदे, लाभधारक शेतकरी 

बंधाऱ्यातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूटात) 
आश्वी- 46.11 
चणेगाव- 59.01 
रामपूर- 58.80 
कोल्हार- 57.64 
मांडवे- 31.45 
गळलिंब- 32.79 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six to fifteen from Ashwavi to Galnimb on the banks of Pravara river