
नगर : संगमनेर, अकोले तालुक्यांमध्ये टोमॅटोवर "कुकुम्बर मोसॅक व्हायरस', "ग्राऊंडनट नेक्रॉसिस व्हायरस', "क्लोरॉसिस व्हायरस', "टोबॅको व्हेन', "डिस्टार्शन व्हायरस', "टोमॅटो लिफ कर्ल नवी दिल्ली व्हायरस', "टोबॅको मोसॅक व्हायरस' या सहा विषाणूंचे अस्तित्व आढळून आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत बंगळूर येथील अखिल भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेकडे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हा तपासणी अहवाल येऊन पंधरा दिवस झाले तरी अजूनही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व कृषी विभागाने याबाबत टोमॅटोउत्पादक शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना दिली नाही. आता नव्याने पावसाळी टोमॅटो लागवड सुरू होत आहे. ननी लागवड केलेल्या शेतकऱ्यांचेही असेच नुकसान होऊ द्यायचे का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
टोमॅटो उत्पादनाचा पट्टा असलेल्या अकोले, संगमनेर या भागातील बहुतांश टोमॅटोचे यंदाच्या उन्हाळ्यात नुकसान झाले. त्याबाबत आतापर्यंत दोन्ही तालुक्यांतील सव्वासातशे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. टोमॅटोचा रंग जाणे, कडकपणा कमी होऊन फळाचा आकार बदलणे व त्यावर वेगवेगळ्या रंगांचे पट्टे दिसू लागणे, यामुळे टोमॅटोला मागणी कमी झाली. परिणामी, जवळपास साडेचारशे हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याने टोमॅटोउत्पादकांना सुमारे वीस कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका बसला. शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर विद्यापीठाच्या पथकाने संगमनेर, अकोले तालुक्यांत टोमॅटोची पाहणी केली.
फळे, पाने व बियाणे तपासणीसाठी बंगळूर येथील संस्थेकडे पाठविले. त्याचा तपासणी अहवाल पंधरा दिवसांपूर्वीच आला आहे, तरी अजूनही त्याबाबत विद्यापीठ व कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती दिली नसल्याचा आरोप करीत, पावसाळी टोमॅटो उत्पादनही अडचणीत येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बाधा होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शक सल्ले प्रकाशित केले आहेत.
ते सहा विषाणू...
तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांमध्ये मावा किडीमार्फत प्रसारित होणाऱ्या "कुकुम्बर मोसॅक व्हायरस'चे (सीएमव्ही) प्रमाण सर्वाधिक आढळून आले. त्यापाठोपाठ फुलकिडीमार्फत प्रसारित होणारा ग्राऊंडनट नेक्रॉसिस व्हायरस, पांढऱ्या माशीमार्फत प्रसारित होणारा टोमॅटो क्लोरॉसिस व्हायरस, मावा किडीमार्फत प्रसारित होणारा टोबॅको व्हेन डिस्टार्शन व्हायरस, पांढऱ्या माशीमार्फत प्रसारित होणारा टोमॅटो लिफ कर्ल नवी दिल्ली व्हायरस व स्पर्शजन्य असलेला टोबॅको मोसॅक व्हायरस, या सहा विषाणूंचे अस्तित्व आढळून आले आहे. बियाण्यांमध्ये मात्र कोणताही दोष नसल्याचे सांगण्यात आले.
टोमॅटोवर सहा प्रकारचे व्हायरस आढळून आल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. त्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला आहे. आम्ही तो शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. कृषी सहायक व इतरांना याबाबत या आठवड्यात प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.
- सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर
उन्हाळ्यात टोमॅटोवर रोग पडल्याने मोठे नुकसान झाले. टोमॅटोउत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला, तरीही आता नव्याने पावसाळी टोमॅटोचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, टोमॅटोवर सहा प्रकारचे व्हायरस असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल येऊन पंधरा दिवस झाले तरी अजूनही विद्यापीठ व कृषी विभागाने त्याबाबत माहिती दिली नाही. उन्हाळ्याप्रमाणे पावसाळी टोमॅटो पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही उद्ध्वस्त करायचे काय?
- सुरेश नवले, शेतकरी व अध्यक्ष, युवा स्वाभिमान सामाजिक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.