राहुरीत तीन महिन्यांत तब्बल साडेसोळाशे कोरोना रूग्ण

विलास कुलकर्णी
Tuesday, 29 September 2020

देशभरात 22 मार्चनंतर 76 दिवस लॉकडाउन झाले. नंतर लॉकडाउन मागे घेताना पहिल्या टप्प्यात प्रवासावरील निर्बंध शिथिल झाले. ई-पास घेऊन प्रवास सुरू झाला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. एक जुलै रोजी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला.

राहुरी : तालुक्‍यातील 96पैकी 74 गावांमध्ये 1641 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांपैकी 1394 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 24 गावांमधील 41 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तालुक्‍यात सध्या 27 गावांमध्ये 206 बाधित रुग्ण आहेत. कृषी विद्यापीठ येथे कोविड केअर सेंटरमध्ये 87, राहुरी फॅक्‍टरी येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये 4, जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी दवाखान्यांत 115 रुग्ण उपचार घेत आहेत. 

देशभरात 22 मार्चनंतर 76 दिवस लॉकडाउन झाले. नंतर लॉकडाउन मागे घेताना पहिल्या टप्प्यात प्रवासावरील निर्बंध शिथिल झाले. ई-पास घेऊन प्रवास सुरू झाला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. एक जुलै रोजी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जुलैअखेर रुग्णसंख्या 73 झाली. ऑगस्टमध्ये रोज एका गावात बाधित सापडू लागले. ऑगस्टमध्ये तालुक्‍यात 273 कोरोनाबाधित झाले. 

तालुक्‍यात एक सप्टेंबरपासून रॅपिड चाचण्या सुरू झाल्या आणि जुलैच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या वीस पट वाढली. मागील 28 दिवसात 1368 नवे रुग्ण आढळले. आता रुग्णसंख्या 1641वर पोचली. पंधरा दिवसांपूर्वी तालुक्‍यात सलग तीन दिवस रोज 90 ते 100 रुग्ण आढळले. 

शहरातील खासगी दवाखान्यांतील महागडे उपचार गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे देवळाली प्रवरा येथे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने खासगी डॉक्‍टरांच्या सहकार्यातून 50 खाटांचे रुग्णालय सुरू झाले.

शासनाने निर्धारित केलेल्या दराच्या निम्म्या दरात उपचाराची व्यवस्था झाली. राहुरी येथे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने 70 खाटांच्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteen hundred and fifty corona patients in Rahuri