गरिबी सोबत झगडत असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

सतीश वैजापूरकर
Friday, 13 November 2020

लॉकडाऊनमुळे हे अर्थचक्र थांबले. हातावर पोट असलेल्या या मुलांसह त्यांच्या घरच्या मंडळींचा उदर निर्वाहाचा प्रश्न जटिल झाला. त्यातच हि दिवाळी आली.

शिर्डी (अहमदनगर) : आपल्या मोठ्या भावंडासमावेत रस्त्यावर उभे राहून ती चिमुरडी मुले साईबाबांचे फोटो व लॉकेट विकायची. लॉकडाऊनमुळे हे अर्थचक्र थांबले. हातावर पोट असलेल्या या मुलांसह त्यांच्या घरच्या मंडळींचा उदर निर्वाहाचा प्रश्न जटिल झाला. त्यातच हि दिवाळी आली.

दिवााळीच्या पहिल्याच दिवशी साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते यांनी या मुलांना मिठाई आणि नव्या कपड्यांची भेट दिली. गरिबी सोबत झगडत असलेल्या या मुलांच्या चेह-यावर हास्य फुलले.

ही पन्नासहून अधिक चिमुरडी मुले एकत्र जमून कोते यांच्या घरी आली. विजय कोते व ताराचंद कोते यांनी या चिमुरड्या पाहूण्यांचे स्वागत केले. मग पाहूण्यांनी त्यांचे घर पहाण्याची इच्छा व्यक्त केली. घर पाहून झाल्यानंतर या सर्वांना पोटभर नाश्ता देण्यात आला. त्यातील एकाने घरासमोरील गाडीतून चक्कर मारण्याची इच्छा निरागसपणे व्यक्त केली. मग या गाडीतून या सर्वांना विमानतळा पर्यत फेरफटका मारण्यात आला. 
नंतर पून्हा या सर्वांच्या हातावर मिठाई ठेऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. 

नगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एक तासाहून अधिक वेळ लोटला तशी हि मुले घरी परत जाण्यासाठी चुळबूळ करू लागली. तोपर्यत त्यांच्या मापाचे नवे कपडे आणण्यात आले. घरातील मंडळींनी या सर्व मुलांनी नव्या कपड्यांचे वाटप केले. त्यांच्या हाती मिठाईचे बाॅक्स ठेवण्यात आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गोड खाऊ आणि नव्या कपड्यांची भेट मिळाल्याने हि मुले आनंदून गेली. या चिमुरड्या पाहूण्याचे आदरातिथ्य पहायला शेजारी पाजारी जमले होते. या सर्वांचा निरोप घेऊन हि गरिबा घरची मुले नवे कपडे आणि मिठाईचे बाॅक्स हाता घेऊन पून्हा आनंदाने माघारी परतली. 

ताराचंद कोते (माजी नगरसेवक, शिर्डी) : साई मंदिरा भोवतालच्या रस्त्यावर उद, टाळ, फोटो व लाॅकेट विकून हि मुले पोट भरतात. त्यांनी कपडे किंवा अन्य काही मदत मागीतली तर गावातील दानशुर मंडळी व भाविक त्यांना मदत करतात. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला काही तरी मिळेल या अपेक्षेने हि मुले आमच्या घरी पाहूणे म्हणून आली. साई निर्माणग्रुपचे अध्यक्ष विजय कोते यांनी या चिमुरड्या पाहूण्यांचा मिठाई व नवे कपडे देऊन पाहूणचार केला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A smile appeared on the faces of children struggling with poverty