म्हणून भगवान विष्णूने केली होती सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची आराधना

So Lord Vishnu had worshiped Siddhivinayaka of Siddhatek
So Lord Vishnu had worshiped Siddhivinayaka of Siddhatek

नगर ः सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.

अष्टविनायकांमधील हा तिसरा  गणपती आहे. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

मंदिराचा इतिहास

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या आणि पेशवे माधवराव यांचा सर्वात जास्त मुक्काम असलेला ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला अशी आख्यायिका आहे.

पेशव्यांच्या सरदारांना असा पावला

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले. तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

असे जाता येईल

श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते.  गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.

दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने सुद्धा जाता येते. अहमदनगर ते सीद्धीटेक हे अंतर श्रीगोंदा मार्गे ९० किमी आहे . तर पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com