म्हणजे आमची काय मारामारी झालीय का?; हसन मुश्रीफ

विनायक लांडे
शुक्रवार, 10 जुलै 2020

चौथ्या लॉकडाउनमध्ये बहुतांश बंधने सैल झाल्याने कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे जिल्ह्यात 400 पेक्षाही जास्त चाचण्या घेण्याचा निर्णय झाला. यापुढे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाने जिल्ह्यातील एकाचाही मृत्यू होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे, त्यांच्यासाठी 400 बेडची, तर इतर रुग्णांसाठी 890 बेडची व्यवस्था आहे.'' 

नगर ः ""कोरोनाला लगाम लावण्यासाठी शासन-प्रशासन मोठ्या जिद्दीने लढत आहे. मुंबई येथील धारावी झोपडपट्टीसारख्या ठिकाणी सध्या फक्त एक पॉझिटिव्ह निघत आहे. मुंबई प्रशासनाकडून आत्मविश्‍वासाने पुढील महिन्यात कोरोना संपविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोठ्या थाटात सांगतात, की कोरोनाची परिस्थिती असताना महाविकास आघाडी एकमेकांत लढण्यात धन्यता मानत आहे. म्हणजे आमची काय मारामारी झाली का?'' असा सवाल करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज फडणवीसांवर सडकून टीका केली. फडणवीसांना काही काम दिसत नाही, त्यांनी कोरोनाची परिस्थिती बाहेर फिरून स्वतःच्या डोळ्यांनी पाहावी, असाही टोलाही त्यांनी लगावला. 

हेही वाचा ः बांधकाममधून "त्याचे' बस्तान शिक्षण विभागात 

कोरोना परिस्थितीबाबत आज झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ""चौथ्या लॉकडाउनमध्ये बहुतांश बंधने सैल झाल्याने कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे जिल्ह्यात 400 पेक्षाही जास्त चाचण्या घेण्याचा निर्णय झाला. यापुढे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाने जिल्ह्यातील एकाचाही मृत्यू होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे, त्यांच्यासाठी 400 बेडची, तर इतर रुग्णांसाठी 890 बेडची व्यवस्था आहे.'' 

जुलै ते सप्टेंबरपर्यंत केसरी कार्डधारकांना पुन्हा स्वस्त धान्य दुकानांतून गहू, तांदूळ आदींचे वाटप करण्यात येणार आहे. अन्य रेशन कार्डधारकांचेही वाटपाचे काम जुलैअखेरीस पूर्ण होईल. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा बॅंकेकडे 94 कोटी तीन लाख रुपये वर्ग झाले आहेत. त्यातील 41 हजार शेतकऱ्यांपैकी 19 हजार 610 शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. मात्र, अद्याप 22 हजार शेतकरी वंचित आहेत. जुलैअखेरीस थेट त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली. 
आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील आदी उपस्थित होते. 

अवश्‍य वाचा ः विजय औटी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्यायच; "तेव्हा' कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिली उमेदवारी 

...अन्यथा "मेस्मा'अंतर्गत कारवाई 
सरकारी हॉस्पिटलचे आरोग्य कर्मचारी जिवाची बाजी लावून कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करत आहेत. अशा सरकारी कर्मचाऱ्यांना मानाचा सलाम आहे. दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या भीतीने दांड्या मारत आहेत. ऍम्ब्युलन्सवरील कर्मचारीही कामावर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे; परंतु अशा हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर "मेस्मा' कायद्यांतर्गत कारवाई करू, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. 

बोगस बियाण्यांबाबत दोन कंपन्यांवर फौजदारी 
जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी बियाण्यांची उगवण झाली नाही. त्यामुळे 641 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर दोन बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. उर्वरित कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले, तर काहींनी शेतकऱ्यांना भरपाई दिली. सध्या युरियाची तूट आहे. जिल्ह्यात 16 हजार टन युरियाची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यासाठी आता दोन हजार टन युरिया प्राप्त होणार आहे. त्याची तातडीने व्यवस्था करा, वाटप लवकरात-लवकर करा, असे निर्देश देऊन युरियाचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचीही सूचना केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

आघाडीतील एकही जण भाजपमध्ये जाणार नाही 
मुश्रीफ म्हणाले, ""पारनेरमधील "राष्ट्रवादी'चे आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्यात धुसफूस असल्याने ते शिवसेनेतील पाच नगरसेवक "राष्ट्रवादी'त घेऊन आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या समितीने तत्काळ आघाडीत समन्वय राखत, त्या पाच नगरसेवकांची घरवापसी केली. मात्र, महाविकास आघाडीतील एकही जण भाजपमध्ये जाणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ.'' 

ग्रामपंचायतीवर क्राइम रेकॉर्ड नसलेला प्रशासक 
राज्यात साधारणपणे 14 हजार ग्रामपंचायती आहेत. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपेल, त्यावर प्रशासक नेमले जाणार आहेत. ती जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर आहे. शक्‍यतो यावर विस्तार अधिकारी नेमले जात होते. परंतु मनुष्यबळाअभावी ज्यांचे क्राइम रेकॉर्ड नाही आदी बाबी तपासून योग्य व्यक्ती निवडला जाईल. डिसेंबरपर्यंत तरी या निवडणुका होणार नाहीत. 73व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ देता येत नाही. मात्र, भाजपने बहुतांश ठिकाणी मुदतवाढ दिली होती. सुप्रीम कोर्टाने ती रद्द करून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. 

नगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा 
जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने येथे होणाऱ्या अन्य आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचार अन्यत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन नगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह पाठपुरावा केला जाईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So what are we fighting for ?; Hassan Mushrif