
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह सुपा पोलिस ठाण्यात नेला. पोलिसांनी आरोपींना पाठिशी घातले, असा अौटी यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक भोसले यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.
पारनेर ः पारनेर तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका निवृत्त झालेल्या जवानाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. दि. ८ जून रोजी मारहाण झालेली असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे नातेवाईक जवानाचे पार्थिव पोलिस ठाण्यात नेण्याच्या तयारीत आहेत. सध्या शवविच्छेदन सुरू आहे. या प्रकारामुळे तणाव वाढला आहे. दरम्यान, जातेगाव येथे पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे ही घटना घडली. मृत जवानाचे नाव मनोज अौटी आहे. आरोपी आणि अौटी यांच्यात एका सोयरिकीच्या कारणावरून वाद झाल्याचे समजते. त्यातूनच सौरव गणेश पोटघन, विकी दिनेश पोटघन, अक्षय बापू पोटघन यांच्यासह चार ते पाचजणांनी अौटी यांना दगड, विटा, लोखंडी रॉडने मारहाण केली.
हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार पाडायला कोण टपलंय
८ जून रोजी सायंकाळी ही घटना घडल्याचे मृताच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. संबंधित आरोपींनी अौटी यांना जबर मारहाण केली होती. त्यातच ते बेशुद्ध झाले. अौटी यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती समजताच ते तेथे गेले. त्यांनी जखमी अौटी यांना नगरला उपचारासाठी हलवले. त्यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर ते सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. परंतु त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला नाही. यासाठी ते तीन दिवस हेलपाटे मारीत होते. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींच्या नातेवाईक महिलेच्या फिर्यादीवरून अौटी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अौटी यांचा आज मृत्यू झाला. संतप्त झालेल्या नातेवाईक त्यांचा मृतदेह सुपा पोलिस ठाण्यात नेण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी आरोपींना पाठिशी घातले, असा अौटी यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक भोसले यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. मयत जवानाचा भाऊ तुषार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जखमी अौटी यांचा मृत्यू झाल्याने कलमांमध्ये वाढ होणार आहे.
मयत अौटी हे तीन महिन्यांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते. सोयरिकीच्या वादातून उभयतांमध्ये वाद झाल्याचे समजते.