वडिलांच्या अनैतिक संबंधाला वैतागून मुलानेच केला खून

सूर्यकांत वरकड
Thursday, 17 September 2020

पारनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेच तपासाला सुरवात केली. श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ, सायबर तज्ज्ञांचे पथक कामाला लागले. पुणे व नगर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतून बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित केली. 

नगर : निघोज (ता. पारनेर) येथील कुकडी नदीत आढळलेल्या बेवारस मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. वडिलांच्या अनैतिक संबंधाला वैतागून त्यांच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने गळा आवळून खून केला व मृतदेह कुकडी नदीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली, तसेच दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. सतीश सदाशिव कोहकडे (वय 49, रा. कारेगाव, ता. शिरूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी प्रदीप सतीश कोहकडे, हर्शल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (रा. कारेगाव, ता. शिरूर) यांना ताब्यात घेतले. 

निघोज येथील कुकडी नदीत कुंड परिसरात 27 ऑगस्ट रोजी पत्र्याच्या कोठीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दामू धोंडिबा घोडे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेच तपासाला सुरवात केली. श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ, सायबर तज्ज्ञांचे पथक कामाला लागले. पुणे व नगर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतून बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित केली. 

दरम्यान, रांजणगाव पोलिस ठाण्यात एका व्यक्तीची "मिसिंग' दाखल होती. संबंधित व्यक्तीची माहिती मृताशी जुळत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना समजले. पारनेर पोलिसांनी 8 सप्टेंबर रोजी रांजणगाव पोलिस ठाण्यात जाऊन माहिती घेतली असता, सतीश कोहकडे 25 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची नोंद आढळली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलावून निघोज येथे आढळलेले मृताचे कपडे व छायाचित्र दाखविले, तेव्हा ही व्यक्ती कोहकडेच असल्याचे स्पष्ट झाले. 

असे संपवलं बापाला

गोपनीय माहितीवरून पोलिसांनी मृत कोहकडे यांचा मुलगा प्रदीप याच्याकडे कसून चौकशी केल्यावर खुनाचा उलगडा झाला. वडील आईला योग्य वागणूक देत नव्हते. घरभाडे, शेतीचे सर्व पैसे अनैतिक संबंध असलेल्या महिलेवर खर्च करीत होते. त्यावरून वडिलांशी नेहमी वाद होत असे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी अनैतिक संबंधातून वडिलांनी आईला मारहाण केली. त्या रागातून प्रदीप याने चार मित्रांच्या मदतीने घरातच वडिलांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली. तोंड दाबून कापडी पट्ट्याने गळा आवळत त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मोटारीतून मृतदेह निघोज येथे कुकडी नदीत फेकून दिला. गुन्ह्यात वापरलेली मोटार करडे घाटातील दरीत सोडून दिल्याचे आरोपींनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी तपास करीत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The son killed his father