अमरापूर परिसरात बहरलेले ज्वारीचे पीक

राजू घुगरे 
Wednesday, 6 January 2021

शेवगाव तालुक्‍यातील अमरापूर परिसर एकेकाळी ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांपासून या परिसरातील पिकांचा ट्रेंड बदलत आहे. ज्वारी, बाजरी, करडई या पारंपरिक पिकांऐवजी कपाशी, तूर, ऊस, कांदा या नगदी पिकांकडे कल वाढला आहे.

अमरापूर (अहमदनगर) : रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकातील कणसात दाणे भरून ते पक्व होऊ लागल्याने ते पक्ष्यांपासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. हिरव्या कोवळ्या लुसलुशीत ज्वारीचा हुरडा चाखण्यासाठी शेतशिवार फुलून गेले आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 

शेवगाव तालुक्‍यातील अमरापूर परिसर एकेकाळी ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांपासून या परिसरातील पिकांचा ट्रेंड बदलत आहे. ज्वारी, बाजरी, करडई या पारंपरिक पिकांऐवजी कपाशी, तूर, ऊस, कांदा या नगदी पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे खरिपा पासूनच केले जाणारे ज्वारीचे नियोजन आता कोलमडले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील खरिपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी केली. यंदा तालुक्‍यात 5887 हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. थंडीचा कडाका वाढताच, कणसात दाणे भरण्यास सुरवात झाली आहे. दुधाळ दाणे हिरवे होऊन पक्व होत असून, ज्वारी हुरड्यात आल्याचे दिसत आहे. कोवळे दाणे टिपण्यासाठी कणसांवर पाखरांचे थवे बसू लागल्याने रानावनात राखणीचे सूर घुमू लागले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्वारीची गुळभेंडी जात हुरड्यासाठी प्रसिद्ध असली, तरी तिचे प्रमाण तुलनेत फार कमी झाले आहे. त्यामुळे कोवळ्या लुसलुसीत हुरड्यांची मेजवानी कमी होत आहे. वडुले, आव्हाणे खुर्द, फलकेवाडी, वरुर, आखेगाव, सामनगाव, मळेगाव परिसरात कमी-अधिक प्रमाणात हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून असणाऱ्या ढगाळ हवामानामुळे ज्वारीवर चिकटा व मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sorghum has been sown in Amarpur taluka