नगर झेडपीच्या इमारतीत बाटल्यांची "पेरणी", चर्चेचे पीक लय जोमात

दौलत झावरे
Saturday, 11 July 2020

जिल्हा परिषदेच्या आवारात पडलेल्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. त्या पार्किंगमधील खड्ड्यात पुरण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या आवारात बाटल्यांचीच पेरणी केली अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगर ः नगर जिल्हा परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळीची चर्चा जरा "मद्या"ळच आहे. ती वाचूनही कैफ चढू शकतो.

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती मुरुम, खडी व डांबर टाकून केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पार्किंगमध्ये पडलेला खड्डा मुरुम, खडीऐवजी चक्क बाटल्यांनी बुजविला आहेत.

त्याचे झाले असे ः जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनित्राच्या पाठिमागे कचऱ्याचा ढिगारा आहे.त्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात बाटल्या आढळून आल्या होत्या.

या संदर्भात दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर कचऱ्यासह काचेच्या बाटल्या हटवल्या. मात्र, दारुच्या या बाटल्या कोठून आल्या, याचा शोध मात्र प्रशासनाकडून घेण्यात आला नव्हता.

या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा दारुच्या बाटल्या जिल्हा परिषदेच्या आवारात दिसू लागल्या आहेत.

हेही वाचा - इंदोरीकरांसाठी मनसेच्या सारल्या बाह्या

जिल्हा परिषदेच्या आवारात पडलेल्या बाटल्या गोळा करून त्या पार्किंगमधील खड्ड्यात पुरण्यात आल्या. ते कोणी पुरल्या, कोणाच्या सांगण्यावरून ही कार्यवाही झाली, याची कोणालाही काहीही माहिती नाही. जिल्हा परिषदेच्या आवारात बाटल्यांचीच पेरणी केली अशी चर्चाम मात्र, जोरात सुरू आहे. या सर्व बाटल्या कंपनीच्या होत्या. विशेष म्हणजे हा प्रकार आपत्कालीन दरवाजासमोरील भागात घडला अाहे. येथून आरोग्य विभागाच्या साहित्यांची ने-आण केली जाते. दरवाजात पुरलेला हा ऐवज आता मोकळा झाला आहे. परंतु हा प्रकार कोणीही सिरियस घ्यायला तयार नाही.

या प्रकाराबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. 
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारात या बाटल्या नेमक्या कोठून येतात, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sowing of liquor bottles in Nagar Zilla Parishad