विशेष पथक फिरतंय बिबट्याच्या शोधात डोंगर दऱ्यात

राजेंद्र सावंत
Sunday, 1 November 2020

बिबट्याचा माग शोधणारी विशेष यंत्रणा यंदा प्रथमच वापरण्यात येत आहे. वास, पावलांचे ठसे, वन्य प्राणी व पक्ष्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे विशिष्ट आवाज यांचाही उपयोग केला जात आहे.

पाथर्डी : सिन्नर, जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके दाखल होताच, त्यांनी तत्काळ बिबट्याच्या शोधमोहिमेला सुरवात केली. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी विशेष पथकासमवेत शनिवारी सायंकाळी घेतलेली बैठक संपताच अत्याधुनिक साहित्यासह पथकाकडून हंडाळवाडीपासून वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगररांगांमध्ये कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत. 

तालुक्‍यातील नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेअंतर्गत राज्याच्या मोहिमेतील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबाजांना पाचारण करण्यात आले आहे. वन विभागाच्या जिल्हास्तरीय मोहिमेचे केंद्र पाथर्डी झाले आहे. जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी मढी येथे शोधमोहीम यंत्रणेचे संचालन करीत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत तालुक्‍यात तीन बालकांना बिबट्याने पालकांसमक्ष उचलून नेऊन ठार मारले. या प्रकारामुळे ग्रामीण भागात भयंकर दहशत पसरली. विशेष तज्ज्ञांची चार पथके आज नव्याने दाखल झाली आहेत. आतापर्यंत बिबट्याने तीनही हल्ले रात्री केल्याने, निशाचर बिबट्या समजून शोधमोहिमेची आखणी केली आहे.

आशा मोहिमेमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना "ऑपरेशन पाथर्डी'साठी पाचारण करण्यात आले आहे. तालुक्‍यात ठिकठिकाणी सध्या अठरा पिंजरे लावले असून, आवश्‍यकतेनुसार पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी अन्य जिल्ह्यांतून पिंजरे मागविण्यात आले आहेत.

बिबट्याचा माग शोधणारी विशेष यंत्रणा यंदा प्रथमच वापरण्यात येत आहे. वास, पावलांचे ठसे, वन्य प्राणी व पक्ष्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे विशिष्ट आवाज यांचाही उपयोग केला जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शिरसाट यांच्या पथकातील कर्मचारी मायंबा परिसरातील माथ्यापासून पायथ्यापर्यंत विशेष साधनसामग्रीसह शोधमोहीम सुरू करणार आहेत. हल्ल्यांच्या घटना सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याच्या आदेशासाठी वस्तुस्थितीची गोपनीय माहिती पथकाकडून संकलित केली जात आहे. 

अत्याधुनिक साहित्य असे ः सर्च लाइट, नाइट मोड कॅमेरे, अत्याधुनिक ट्यूब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे रेस्क्‍यू व्हॅन, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे, लाठ्या-काठ्या, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्ट, वॉकी-टॉकी सेट. 

केळवंडी, मढी, शिरापूर या भागातील व डोंगरपट्ट्यातील गावांतील लोकांनी रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये व घरातच झोपावे. आम्ही रात्री फिरतो तेव्हा लोक घराबाहेर झोपलेले दिसतात. काही दिवस काळजी घ्यावी. 
- आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special squads roam the mountain valley in search of leopards