esakal | कर्मवीर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

State level oratory competition on the occasion of Karmaveer Jayanti

कर्मवीर आण्णा हे महान समाजसुधारक व शिक्षणप्रसारक होते. त्यांनी वंचित व बहुजन समाजाला शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांचे विचार आणि कार्याचा वसा घेऊन संस्था काम करीत आहे.

कर्मवीर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : कर्मवीर आण्णा हे महान समाजसुधारक व शिक्षणप्रसारक होते. त्यांनी वंचित व बहुजन समाजाला शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांचे विचार आणि कार्याचा वसा घेऊन संस्था काम करीत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण उपक्रम सुरू आहे. त्यामुळे येथील डाकले महाविद्यालयाने कर्मवीर जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करुन एक आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी केले.

रयतच्या येथील डाकले जैन महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 58 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर आण्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या ऑनलाइन शुभारंभाप्रसंगी मीनाताई बोलत होत्या. याप्रसंगी अॅड. विजय बनकर प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रकाश निकम अध्यक्षपदी उपस्थित होते. ऑनलाइन स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी प्राचार्य एल. डी. भोर यांनी प्रस्ताविक केले.

पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील भक्ती देशमुख व अश्विनी तावरे यांनी प्रथम सांघिक पारितोषिक पटकावले. तर धुळे येथील सी. डब्ल्यू. एस. महाविद्यालयातील धर्मेश अहिरे व प्रसाद जगताप यांनी द्वितीय पारितोषिक पटकाविले. नगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स महाविद्यालयातील अनिकेत दामले व रेवन भोसले यांनी तृतीय पारितोषिक मिळविले.

इचलकरंजी येथील रात्र महाविद्यालयातील अक्षय येळके, नाशिक येथील के. टी. एच. एम महाविद्यालय गायत्री वडघुले व पंढरपूर येथील के. बी. पी महाविद्यालयातील हेमा भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. निलेश पर्वत व आबासाहेब कापसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. योगीराज चंद्रात्रे व प्रा. विवेक मोरे यांनी तंत्रसहाय्य केले. प्रा. संध्या साळवे यांनी सुत्रसंचालन केले. तर डॉ. बी. जी. घोडके यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर