कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून 60 लाख सह्यांचे निवेदन दिल्लीकडे रवाना

आनंद गायकवाड
Wednesday, 18 November 2020

एखाद्या अन्यायकारक कायद्याविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही.

संगमनेर (अहमदनगर) : एखाद्या अन्यायकारक कायद्याविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या 60 लाख सह्या या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले. 

केंद्रातील भाजपच्या सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाचा भाग असलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, तब्बल 60 लाख शेतकरी, शेतमजुरांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे हे भव्य निवेदन सूपूर्द करण्यात आले.

मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, डॉ. वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, आशिष दुआ, आमदार भाई जगताप, अमिन पटेल, झिशान सिद्दीकी, सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, राजेश शर्मा, सचिव राजाराम देशमुख, जोजो थॉमस, मेहुल व्होरा, झिशान सय्यद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याविरोधातील आंदोलने मोठ्या हिरीरीने आणि यशस्वीपणे पार पाडली. सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांचा सहभाग असलेली महा व्हर्च्युअल शेतकरी रॅली, ट्रॅक्टर रॅली, धरणे आंदोलन करुन या कायद्याविरोधात आवाज बुलंद केला. आता 60 लाख सह्यांचे निवेदन जमा केले, इतिहासात अशी मोहिम राबवली गेली नाही. शेतकऱ्यांसाठी अन्यायी असलेले हे कायदे रद्द झाले पाहिजेत.

महाराष्ट्र नेहमीच देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले आहे. आताही महाराष्ट्र सरकारने पंजाबपेक्षा चांगला कृषी कायदा करुन शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसने सर्व आंदोलने यशस्वी केली आहेत. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे असे पाटील म्हणाले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात हरितक्रांती झाली आणि कृषी क्षेत्राचे रुप बदलले. परंतु सध्याच्या भाजपा सरकारने शेतकऱ्याला देशधडीला लावण्याचे काम केले आहे. या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने मोठे आंदोलन हाती घेतले, महाराष्ट्रात ही आंदोलने मोठ्या प्रमाणात यशस्वी केली. कोरोना, अतिवृष्टी, पूरस्थिती असतानाही मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी व कामगार या आंदोलनात सहभागी झाले.

राज्यातील 60 लाख शेतक-यांच्या सह्याचे निवदेन आज प्रभारी एच. के पाटील यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडे पाठवले आहे. देशभरातील शेतकऱ्यांचे सह्यांचे हे निवेदन 19 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे देण्यात येणार आहे. हे कायदे रद्द करण्यापर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार आहे, असेही थोरात म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने संविधान, संसदीय नियम व परंपरा यांची पायमल्ली करुन कोणत्याही चर्चेविना कृषि व कामगार विषयक विधेयक मंजूर करुन घेतले व लागू केले. या विधेयकाला काँग्रेसचा सुरुवातीपासूनच विरोध होता.

म्हणूनच भाजप सरकारच्या कृषी व कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी, शेतकरी व मजूर यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये तसेच प्रत्येक विभागामध्ये कृषी व कामगार कायद्यांविरोधात सह्यांची मोहीम सुरु केली आणि मुंबईकरांनी देखील उस्फुर्तपणे या सह्यांच्या अभियानात सहभागी होऊन या कायद्याला आपला विरोध दर्शविला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement of 60 lakh signatures sent from Maharashtra to Delhi against Agriculture Act