
निसर्गाच्या कुशीत असलेल्या आंबेवाडी येथे डांग जनावरांचे संवर्धन करण्याचे काम येथील एकनाथ महादू बिन्नर हा गुराखी करत आहे.
अकोले (अहमदनगर) : निसर्गाच्या कुशीत असलेल्या आंबेवाडी येथे डांग जनावरांचे संवर्धन करण्याचे काम येथील एकनाथ महादू बिन्नर हा गुराखी करत आहे. एका विशिष्ट हकेत ही जनावरे एका ठिकाणी विश्रांती करतात व विश्रांती झाल्यावर हुईके म्हटल्यावर व शिळ घातल्यावर एका रांगेत त्याच्या मागे चालतात.
अलंग, कुलांग, मलंग गडावर रोज आंबेवाडी ते गड असा त्यांचा प्रवास असतो. सुमारे शंभर जनावरे घेऊन हा गुराखी डांग जातीचे गाई, गोऱ्हे, कालवड सांभाळून आपले दहा माणसांचे कुटुंब सांभाळत आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दहा वर्षांपासून तो हे काम अविरतपणे करत आहे. पावसाळा पूर्वी तो आपली जनावरे कोकणात घेऊन जातो. दसरा सणा पूर्वी जनावरे पुन्हा आपल्या आंबेवाडी येथे आणून त्यांचे पालनपोषण करतात. डांग जातीचे जनावरे सध्या कमी होत असून शेतकरी त्यांचे उत्पादन कमी असल्याने जनावरे सांभाळणे दुरापास्त होत असताना आंबेवाडी गावात पाचशे डांग जनावरे असून येथील ग्रामस्थ शेतीबरोबर डांग जनावरे सांभाळून आपले कुटुंब चालवतात.
मात्र सांभाळ करताना त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम देखील करतात तर एका विशिष्ट हाकेत ही जनावरे चालू लागतात. गुरख्याच्या मागे चालत डोंगरावर जाऊन चारा खाऊन पोट भरल्यावर पुन्हा गडावरून घराकडे येतात. एका विशिष्ट आवाजाने हे डांगी जनावरे बसतात उठतात व चालायला लागतात.
डांगी पशुधन हे आदिवासी भागाचे वैभव असून डांगी गाई म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारातील लक्ष्मी असल्याचे शेतकरी सांगतात. देशामध्ये एकूण २७ प्रकारच्या दूध देणाऱ्या गाई आढळतात त्यापैकी डांगे प्रजाती ही तिच्या खास वैशिष्ट्यांमुळे पहिल्या तीन मध्ये समाविष्ट होते हे गौरवास्पद आहे.तालुक्यात आढळणार्या डांगे प्रजातींचे जी आय मानांकन होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच डांगी गायीच्या गोमूत्र पासून विविध प्रकारचे व पदार्थ तयार करण्यावर भर दिला पाहिजे.
संपादन : अशोक मुरुमकर