संगमनेरला आला पूर... घरे गेली पाण्याखाली; लोक चढले छतावर

आनंद गायकवाड
Monday, 3 August 2020

मानसाचे आयुष्य भल्या बुऱ्या आठवणींच्या विणीने बनलेले असते. त्यातील काही आठवणी सुखद तर काही क्लेषकारक असतात.

संगमनेर (अहमदनगर) : मानसाचे आयुष्य भल्या बुऱ्या आठवणींच्या विणीने बनलेले असते. त्यातील काही आठवणी सुखद तर काही क्लेषकारक असतात. तरी प्रसंगानुसार त्या आठवतात हे मात्र नक्की. संगमनेर शहरातील प्रवरा नदीकाठच्या सखल भागाला जलमय करणाऱ्या 64 वर्षापूर्वीच्या महापुराची आठवण आजही संगमनेरकरांच्या मनात ताजी आहे.

आषाढी एकादशीचा 3 ऑगस्ट 1956 सालातील या दिवसाची आठवण अंगावर शहारा उठवते. आदल्या दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली नव्हती. गावातल्या सगळ्या विठ्ठल मंदिरात भजन किर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. आणि अचानक नगरपालिकेच्यावतीने गावात भोंगा फिरू लागला.

प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकाच वेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सावध रहावे. संगमनेरला पूर नवीन नव्हते. 

1946 मध्ये आलेल्या पुराच्या तडाख्यात 500 पेक्षा अधीक घरे सापडूनही फारशी हानी झाली नव्हती. फारतर राम मंदिराशेजारच्या रथापर्यंत पाणी येत असल्याने चिंता नव्हती. भंडारदऱ्याला मुसळधार पाऊस सुरू होता, दुपारी बाराच्या दरम्यान प्रवरेच्या पाण्याची पातळी आणि वेग वाढला, म्हाळुंगीच्या पात्रातून काहीशा संथपणे वाहणाऱ्या पाण्याला सहजासहजी प्रवरा आपल्यात सामावून घेत नाही. मग म्हाळुंगीच्या पाण्याचा फुगवटा वाट फुटेल तिकडे धाव घेतो. यावेळी हेच झाले दोन्ही नद्यांचे पाणी प्रचंड वेगाने पश्चिमेला सरळ वहात जाताना गावातही प्रवेश करीत होते. 

परदेशी मठ, राम मंदिराशेजारचा हनुमानाचा रथ, चंद्रशेखर चौक ओलांडून पाणी ज्ञानेश्वर मंदिर आणि ब्राम्हण बोर्डिंगच्या पायऱ्यांना लागले तेव्हा मात्र लोकांना या पुराचे गांभीर्य अधिक जाणवले. दुसऱ्याबाजूला पुराचे पाणी शनी वेस ओलांडून चव्हाणपुरा, रंगारगल्लीच्या सीमा ओलांडून पश्चिमेला नेहरू उद्यानापर्यंत आणि खाली बाजारपेठच्या दिशेने सरकायला लागले. कसबा पेठेतल्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराच्या पायरीला पुराच्या पाण्याने स्पर्श केला. नदीकाठच्या वाडेकर गल्ली, चंद्रशेखर चौक, परदेशपूरा या भागातील अनेक घरात पाणी शिरले. गोरगरिबांच्या मातीच्या घरांच्या भिंती ढासळल्या. याच भागात विणकर वस्ती व अनेक हातमाग होते. 

अनेकांच्या घरातील तयार झालेली लुगडी, सूताचे अतोनात नुकसान झाले. गावातल्या उंचावरच्या पेटिट शाळा व अन्यत्र लोकांना हलवण्यात आले. अनेकांनी नदीपासून दूर रहात असलेल्या आपल्या परिचितांच्या घरी आश्रय घेतला. प्रवरेच्या मोठ्या पुलावरुन पाणी वाहण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांनी दुसऱ्या मजल्यावर आश्रय घेतला.
हे विघ्न टाळण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष अमृतराव ढोले यांनी प्रवरामाईची खणा नारळाने ओटी भरली. योगायोगाने त्यानंतर हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र या पुराने मोठी हानी केली. अनेकांच्या घरातली भांडी कुंडी, कपडे काहीच शिल्लक राहीले नाही. अनेकांनी पुढचे काही दिवस शाळेत तसेच कचेरीमागील मैदानावर बांबू आणि चटयांच्या तात्पुरत्या राहुट्यांमध्ये आश्रय व भोजनाची व्यवस्था सरकारी यंत्रणेने केली. गावातल्या सगळ्या शाळांना आठ दिवस सुट्टी देण्यात आली. 

नाशिकच्या जयनारायन रघुनाथ कलंत्री यांनी गरजूंना कपडे वाटप केले. निम्म्या संगमनेर गावावर या पुराचा प्रभाव पडला होता. चंद्रशेखर चौकात तर गुडघ्या इतक्या उंचीचा गाळ तयार झाला. घरोघरच्या आडातही चिखल झाल्यामुळे प्यायला किंवा स्वयंपाकाला स्वच्छ पाणी दुर्मिळ झाले होते. या पुरात चारशे घरे पडली. हा पुर अनुभवणारे ज्येष्ठ संगमनेरकर आजही त्या आठवणींनी शहारतात. राज्यातल्या सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांनी संगमनेरच्या या पुराची दखल घेतली होती.

‘सकाळ’चे संपादक नानासाहेब परुळेकर यांनी ‘सकाळ’च्या वतीने पथक पाठवले होते. त्यांना पेटिटच्या मराळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब दातरंगे यांनी मदत करुन नुकसानीचा अहवाल तयार केला. त्यानुसार सकाळकडून विणकरांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली होती.

(बातमीतील फोटो 1956 मध्ये आलेल्या महापुराचा चंद्रशेखर चौकातील आहे : सौजन्य : डॉ. संतोष खेडलेकर)

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of the flood in Sangamner taluka 64 years ago