घराला दरवाजेच नाहीत, चोरी करणारा होतो आंधळा! या मुलखावेगळ्या गावची कथा आहे इंटरेस्टींग

The story of Shanishinganapur village is interesting
The story of Shanishinganapur village is interesting
Updated on

सोनई (जि.अहमदनगर) ःग्रहदेवता व साडेसातीचा तारणहार म्हणून शनिदेवतेला महत्व आहे. येथे सर्वसामान्य भक्तांसह चित्रपट क्षेत्रातील कलाकार मंडळी, राजकीय नेतेही शनिदर्शनाला येतात. येथे आल्यानंतर अभिषेक केला तर साडेसाती जाते. 

शनिदेवाचे हे शनिशिंगणापूर नेवासा तालुक्यातील सोनईपासून चार किलोमीटर व अहमदनगर-औरंगाबाद राज्यमार्गापासून चार किलोमीटर (नगर-घोडेगाव फाट्यावरून पश्चिमेला ४० किमी.) आहे. घराला दरवाजा नसलेले, देव असून देऊन नसलेलं, वृक्ष असून छाया नसलेलं गाव धार्मिक आणि पर्यटनाच्या नकाशावर आहे.

अशी आहे अख्यायिका ः पाचशे वर्षांपूर्वी मोठ्या पावसाने गावातील पानसनाला ओढ्यास महापूर आला. या पुरात एक दगडी शिळा वाहून आली. ही शिळा बोराच्या झाडाला अडकली होती. या शिळेत स्वयंभू शनि भगवान असल्याचा दृष्टांत गावातील एका वृध्दास झाला. ही मूर्ती सख्या मामा-भाच्याने हात लावला तरच जागेवरून हलेल, असा तो दृष्टांत होता. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी, मात्र मंदिर बांधू नये, अशा आशयाचा तो दृष्टांत होता. त्यामुळे ती मूर्ती चौथ-यावर स्थापन करण्यात आली.

स्वयंभू शनिमूर्ती उघड्यावर असल्याने गावातील घरांनाही दरवाजा, कडी-कुलूप नाही. येथे चोरी होत नसल्याचे सांगितले जाते. पाचशे वर्षांपूर्वी येथे शनिमुर्तीची प्रतिष्ठापना झाली असली, तरी १९६३ मध्ये येथे ट्रस्ट स्थापन होवून पाच जणांचे विश्वस्त मंडळ करण्यात आले. स्व.बाबुराव बानकर सलग तीस वर्षे अध्यक्ष म्हणून होते. शनिशिंगणापुरच्या जडणघडणीमध्ये बानकर यांचा खूप मोठा वाटा आहे.

सन १९८५ पर्यंत देवाला दिवाबत्ती करण्याइतपतही रक्कम दक्षिणा म्हणून मिळत नव्हती. येथे त्याकाळी रोज शंभरच्या दरम्यान, शनिवारी पाचशे तर शनिअमावस्येला एक ते दोन हजार भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र, सन १९९३ साली सुर्यपुत्र शनिदेव चित्रपट झळकल्यानंतर रोज वीस ते पंचवीस हजार, शनिवारी एक लाखाच्या दरम्यान तर अमावस्येला आठ लाखांहून अधिक भाविकांची गर्दी सुरू झाली. गर्दी वाढल्याने गाव व परीसराचा आर्थिक स्तर चांगलाच उंचावला आहे. 

येथे सन ९३ नंतर जशी गर्दी वाढली तशी पैसे कमविण्याची एक-एक शक्कल पुढे येत गेली. पूर्वी देवाला फक्त तेल व रुईच्या पानाचा हार असायचा. आता पूजा साहित्याची मोठी रेलचेल झाली आहे. येथे काही वर्ष ओल्या वस्त्राने चौथ-यावर जाऊन दर्शन घेतले जात होते. केशरी रंगाच्या ओल्या वस्त्राआडून भक्तांची मोठी फसवणूक व लुटमार होवू लागल्याने विश्वस्त मंडळाने सात वर्षांपूर्वी ओल्या वस्त्रा नियम बंद केला.

गुलशनकुमार-अनुराधा पौडवाल यांचे योगदान

शनिभक्त स्व. गुलशन कुमार व प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या विशेष संकल्प आणि प्रयत्नाने 'एटीएन' वाहिनीवर श्री सुर्यपुत्र शनिदेव हा चित्रपट सन १९९३ साली दाखविण्यात आला. घराला कडी-कुलूप व दरवाजा नसणारं शनिशिंगणापूर हे गाव संपूर्ण देशात व परदेशात 'मुलखावेगळं गाव' म्हणून नावारूपाला आलं.

चोरी करणाऱ्यांचे जातात डोळे...

येथे चित्रपट कलावंत, विविध राज्यातील राजकीय नेते, उद्योगपती व न्यायाधीश दर्शनासाठी येतात. आल्यानंतर उदासी महाराज मठात अभिषेक करूनच स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतात. उत्सुकता म्हणून हे व्हीआयपी दरवाजा नसलेलं गाव पाहतात. तसेच शनिमूर्ती वाहून आलेल्या पानसनाल्यालाही भेट देतात. वृक्ष असून छाया नाही, घर असून दरवाजा नाही व देव असून देवूळ नाही. गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

बँकेलाही नाही दरवाजा, फांदी जळते आपोआप

शनिशिंगणापूर येथील शनिचौथऱ्याजवळ एक लिंबाचे झाड आहे. त्या झाडाची फांदीही मूर्तीजवळ येत नाही. जरी ती आलीच तरी ती आपोआप वाळून जाते. याचा अनुभव अलिकडील पिढीने घेतला आहे. या गावात एका बँकेची शाखा झाली. तिने परंपरा राखत दरवाजा बसवला नाही. 

देवस्थानची विधायक कामं

देवस्थान ट्रस्टच्या  माध्यमातून ग्रामीण रुग्णालय, विद्यालय, वारकरी निवासी शिक्षण संस्था, गोशाळा सह विविध उपक्रम आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख  व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या पन्नास कोटी रुपये खर्चाच्या पानसनाला प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथे पंच्याहत्तर फूट उंचीचा दीपस्तंभ साकारला आहे. येथे नवग्रह मंदीर, बगीचा, घाट, भुयारी दर्शनपथासह दगडापासून साकारलेली कलाकृती पाहण्यास मिळणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com