मतीमंद दिराची सेवा करणे हेच जणू ‘ती’च्या आयुष्याचे व्रत आहे

अशोक मुरुमकर
Wednesday, 18 November 2020

सासु- सून, वहिनी-भाऊजी, नणंद- भाऊजई यांचे जमत नसल्याचे कौटुंबिक कलह रस्त्यावर आल्याचे, कोर्ट -कचेरीत गेल्याची एक ना अनेक उदाहरणे दररोज पहायाला मिळत आहेत.

अहमदनगर : सासु- सून, वहिनी-भाऊजी, नणंद- भाऊजई यांचे जमत नसल्याचे कौटुंबिक कलह रस्त्यावर आल्याचे, कोर्ट -कचेरीत गेल्याची एक ना अनेक उदाहरणे दररोज पहायाला मिळत आहेत. या कलहातून अनेक कुटुंब विभक्त झाल्याची उदाहरणे आहेत.

लग्न झालं आणि काही दिवस गेले की, लगेच या ना त्या कारणावरुन घरांमध्ये कुजबुज सुरु होते. त्यातच एखादी मुलगी नवीन लग्न होऊन येताच एखाद्या घरात दिव्यांग किंवा मतीमंद नणंद किंवा दिर असेल तर? कल्पना करा काय होत असेल? माञ, आजच्या जमान्यात यालाही काही सुना अपवादही आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गीता अण्णा काळे! आपल्या मतीमंद दिराची दैनंदिन सर्व कामे त्या मनोभावे करतात. ऐवढेच नाही तर आपल्या या 32 वर्षाच्या दिराची दाढी देखील त्या करतात. एखादी बहीण सुद्धा त्याच्याप्रमाणे भावाची सेवा करणार नाही. त्यांनी जणू आयुष्यभर दिराची सेवा करण्याचे व्रतच घेतले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गीता काळे या करमाळा (सोलापूर) तालुक्यातील विहाळ येथील आहेत. करमाळा- पुणे रस्त्यावर विहाळ हे छोटेसे गाव आहे. या गावाच्या हद्दीत काळे कुटुंब मारकड वस्तीवर राहते. सासू, सासरे, दीर, दोन मुले व पती असं त्यांचे कुटुंब आहे. पती अण्णा हे वीट येथे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक आहेत. गीता यांचा २०१० मध्ये विवाह झाला. त्यांचे शिक्षण १२ वी झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले ताकविकी हे त्यांचे माहेर आहे. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांना चार काका आहेत. एकञ कुटुंबातील असल्याने गीता कमालीच्या सोशीक आहेत.

जेवण न करता पाहुणे निघुन गेले
१२ वी झाल्यानंतर त्यांना विवाहासाठी स्थळ पाहणे सुरु झाले. त्यात अण्णा काळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अण्णा काळे यांचे बंधु हरिभाऊ ऊर्फ संतोष हे मतीमंद आहेत. अनेकदा विवाह जमवताना दिव्यांग मुलांमुळे नातेसंबंध जुळत नाहीत. तसाच अनुभव अण्णा काळे यांना आला. मात्र, काहीही झाले तरी आपली जी परिस्थिती आहे. ती येणा-या पाहुण्यांना माहित व्हावी, म्हणून ते आलेल्या पाहुण्यांपुढे हरिभाऊला बसवत. त्याची आधी माहिती सांगत. मात्र, अनेकांना हे पटत नव्हते. भाऊला पाहूण काहीजण जेवण न करताच निघून जायचे असं काळे सांगत आहेत.

मुलगा चांगला आहे, घर चांगले आहे, आई- वडील चांगले आहेत पण दिर मतीमंद आहे, म्हणून नातेसंबंध जोडत नव्हते. काळे यांना २००६ ला नोकरी लागली. त्यानंतर २००७ पासून स्थळ पाहण्यास सुरु झाले. २०१० पर्यंत त्यांचा केवळ भावामुळे विवाह जमत नव्हता. तरी सुद्धा जी भावाची परिस्थिती आहे, ती आपण लपवायची नाही, असा त्यांचा जणू पणच होता. काहीही झाले तरी पहिल्यांदा मी भावाचीच माहिती सांगणार, यावर ते ठाम होते. दरम्यान २०१० ला त्यांचा गीता यांच्याशी विवाह झाला. हरीभाऊ यांना सहा वर्षाचे असताना ताप आला. त्यावर आई रतन यांनी करमाळ्यातील एका रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी त्याला तापातच इंजेक्शन दिले. 

डॉ. आवटे यांनी स्वत: उपचारासाठी मदत
तापात इंजेक्शन दिल्याने हरिभाऊला फिट येण्यास सुरवात झाली. त्यानंतर हरिभाऊ तीन दिवस बेशुद्ध होते. तेव्हापासून त्यांना फिट येऊ लागली. 6 वर्षापर्यंत व्यवस्थित असलेल्या हरिभाऊ ला फिट्स चा आजार सुरू झाला. त्याच परिणाम म्हणजे त्यांच्या बुध्दीचा हवा तसा विकास झालाच नाही. ते मतीमंदच झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आण्णा काळे यांचा कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व सध्याचे राज्याचे साथ रोग नियंत्रण कक्ष प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी संपर्क आला व आपल्या भावाला काय उपचार घ्यावा म्हणून त्यांनी डाॅ.आवटे यांचे मार्गदर्शन घेतले. डाॅ.आवटे यांनी उपचारासाठी सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयातही उपचारासाठी दाखल केले होते.  त्याला लागणारा खर्चही त्यांनी केला होता. तेव्हा अण्णा काळे यांची परस्थिती अतिशय नाजूक होती. 

माझाच भाऊ असा असता तर?
वडील किसन यांनी सालागड्याचे काम सोडून मजुरी चे काम सूरू केले होते. तर आईही मजुरी करत होती, असं काळे सांगत आहेत. पुर्वी बार्शी येथेही त्यांच्यावर उपचार केले. मात्र, पाहिजे तसा परिणाम झाला नाही. माञ डाॅ.आवटे यांच्या सल्ल्याने त्यांच्या उपचाराला दिशा मिळाली. पुढे २०१० ला विवाह झाला. तेव्हा पत्नी गीताला भावाबद्दल सांगितले. त्यावर गीता म्हणाली, जर माझाच भाऊ ‘असा’ असता तर?
गीता या विवाह झाल्यापासून हरिभाऊच्या दैनंदिन कामे करतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर हरीभाऊला ब्रश करायला सांगणे. त्यांना अंघोळीसाठी पाणी देणे अनेकदा अंघोळी घालणे, त्यांची कपडे धुणे याशिवाय त्यांची दाढी करणे हे सुद्धा अगदी आईप्रमाणेच त्या त्यांची कामे करतात. डोळ्यांवर सुद्धा विश्‍वास बसणार असे काम मनापासून त्या करतात. 

हरीभाऊ हे दाडी- कटींग करण्यासाठी विहाळ,कोर्टी येथे जात. अण्णा काळे हे त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन जात होते. मात्र, हरीभाऊ मतीमंद असल्यामुळे काही लोक त्याची चेष्टा करत. त्याला उगच काहीतरी विचारत. हे सर्व अण्णा यांच्यासमोर घडत होतं. मात्र, ते काहीच करु शकत नव्हते. हरीभाऊ यांचे वय वाढले मात्र, बुद्धीचा विकास झाला नाही. ते शेतात कामही करतात. मात्र, ते सर्व त्यांच्या मनावर. परंतु काही दिवसानंतर अण्णा यांनी हरीभाऊची घरीच दाढी करण्यास सुरुवात केली.

फक्त कटींगला ते गावात घेऊन जात. मात्र, लोकांची मानसिकता कायम होती. एक दिवस काही तरी कामाच्या घाईत अण्णा हरीभाऊची दाढी करायचे राहून गेले. हरीभाऊची वाढलेली दाढी पाहून गिता यांनी हरीभाऊची दाढी करण्याचा निर्णय घेतला. पहील्यांदा दाढी करताना गीता यांची नंणद रेखा गावी आल्या होत्या. त्यांनी या कामात मदत केली. तेव्हापासून विनाखंड त्या हभरीभाऊची दाढी करतात. न लाजता त्या ही सेवा करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of the struggle between Geeta Kale and Haribhau at Vihal