जलसंपदा यांत्रिकीचा राहुरीत सुरू होणार उपविभाग

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 April 2021

मंत्री तनपुरे म्हणाले, की "राहुरी तालुक्‍यात नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण, मुसळवाडी तलाव, कोल्हापूर पद्धतीचे दहा बंधारे आहेत.

राहुरी : राहुरी खुर्द येथे जलसंपदा खात्याचा यांत्रिकी उपविभाग सुरू केला आहे. जलसंपदा विभागाच्या अद्ययावत मशीनरीचा हा उपविभाग तालुक्‍यात आल्याने शेती सिंचन अधिक सुलभ होणार आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. 

मंत्री तनपुरे म्हणाले, की "राहुरी तालुक्‍यात नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण, मुसळवाडी तलाव, कोल्हापूर पद्धतीचे दहा बंधारे आहेत. मुळा धरणामुळे राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी या तालुक्‍यातील 80 हजार हेक्‍टर क्षेत्रास प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होतो.

मुळा धरणातून उजवा व डावा कालव्यांची लांबी 70 किलोमिटर आहे. तसेच भंडारदरा धरणाच्या प्रवरा उजव्या कालव्यामुळे तालुक्‍यातील बऱ्याच क्षेत्रास प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होतो. परंतु, राहुरी तालुक्‍यात जलसंपदा विभागाचा यांत्रिकी उपविभाग नसल्यामुळे तातडीच्या गरजेवेळी मशीनरी आणण्यासाठी विलंब होत असे.

राहुरी खुर्द येथे असलेल्या मुळा पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात मशीनरी उभी करण्यासाठी पुरेशी जागा, कार्यालयासाठी इमारतही उपलब्ध आहे. याठिकाणी यांत्रिकी उपविभाग मंजुर करण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे केली होती. त्यानुसार शासनाने 31 मार्च रोजी आदेश निर्गमित करुन, यांत्रिकी उपविभाग सुरू केला.

"धरण व कालव्यांच्या देखभाल दुरूस्तीची कामे यांत्रिकी विभागाकडून करण्यात येते. यासाठी या विभागाकडे आवश्‍यक ती मशीनरी उपलब्ध आहे. त्याचा लाभ मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील चारही तालुक्‍यांना तसेच नगर पाटबंधारे विभागाच्या राहुरी तालुक्‍यातील लाभक्षेत्रास होणार आहे.

जलसंपदा विभागाच्या अद्ययावत मशीनरीचा हा उपविभाग तालुक्‍यात आल्याने शेती सिंचन अधिक सुलभ होणार आहे." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sub-division of Water Resources Department will be started at Rahuri