Ahmednagar : २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करा ; प्राजक्त तनपुरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राजक्त तनपुरे

२१ नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करा ; प्राजक्त तनपुरे

राहुरी : सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यावर काही हरकती असल्यास २१ नोव्हेंबरपर्यंत श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी किंवा राहुरी येथील तहसीलदारांकडे दाखल कराव्यात, असे आवाहन नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

धामोरी बुद्रुक येथे सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात तनपुरे बोलत होते. श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, ‘‘सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. या प्रश्‍नाबाबत नजीकच्या काळात केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांची वेळ घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

दरम्यान, राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मुळा धरण प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. दोन्ही प्रकल्पांतील बाधित व विस्थापित शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. आता सुरत-हैदराबाद महामार्गासाठी तिसऱ्यांदा जमिनीचे अधिग्रहण होत आहे.

या महामार्गात बागायती शेतजमिनीसह पक्की बांधकामे, विहिरी, कूपनलिका जाणार असल्याने प्रकल्पबाधितांच्या भावना तीव्र आहेत.

१९ गावांतून जाणार महामार्ग

राहुरी तालुक्यातील धानोरे, सोनगाव, माळेवाडी-डुक्रेवाडी, कानडगाव, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर, कणगर खुर्द, कणगर बुद्रुक, चिंचविहिरे, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, डिग्रस, सडे, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी या १९ गावांमधून महामार्ग जाणार असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक जमिनीचे अधिग्रहण राहुरी तालुक्यातून होणार आहे.

loading image
go to top