
नेवासे तालुक्यातील "ज्ञानेश्वर'ची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी घुले-बंधूंसह त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केले. 135 पैकी 111 इच्छुक उमेदवारांनी घुले बंधुंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आपले अर्ज मागे घेतले.
नेवासे : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंची कोणतीच "डिमांड' मान्य न करताही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, या निमित्ताने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसभरात अनेकांकडून मुरकुटे यांच्या मनधरणीचे राजकीय प्रयोग रंगले.
यात फक्त तासाभरातच ही निवडणूक बिनविरोध करून ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले "बाजीगर' ठरले. "ज्ञानेश्वर'च्या बिनविरोध होण्यामागचे तेच खरे "किंगमेकर' असल्याचे अनेकांनी अनुभवले.
हेही वाचा - महाविकास आघाडीसाठी शरद पवारांनी टाकले फासे
नेवासे तालुक्यातील "ज्ञानेश्वर'ची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी घुले-बंधूंसह त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केले. 135 पैकी 111 इच्छुक उमेदवारांनी घुले बंधुंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आपले अर्ज मागे घेतले. मात्र, या निवडणुकीचे खरे राजकीय नाट्य रंगले ते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह दोघा समर्थकांच्या दाखल उमेदवारी अर्ज माघारीसाठी. तेही शेवटच्या दिवशी सकाळी दहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत.
"ज्ञानेश्वर'ची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून या दिवशी सकाळपासून सायंकाळी साडेसातपर्यंत मुरकुटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ऍड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, भाजप नेते विठ्ठल लंघे, सचिन देसरडा आदींनी बंद खोलीत केलेल्या मनधरणीला मुरकुटेंच्या अवास्तव "डिमांड'मुळे यश आले नाही. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता कारखानास्थळी मुरकुटे व चंद्रशेखर घुले यांची बंद खोलीत तब्बल तासभर खलबत सुरू असताना गंभीर चेहरा घेत मुरकुटे तेथून निघून गेले. त्यापाठोपाठ घुलेही बाहेर पडत यंत्रणेला "चिन्हे' वाटप करून घ्या, असे सांगून निघून गेले.
अन् मुरकुटेंचे बंड थंडावले
घुले-मुरकुटे चर्चेत मुरकुटेंनी इतर अवास्तव "डिमांड'सह ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, अॅड. देसाई देशमुख यांना विरोध दर्शवत या दोन जागेसह वडाळा गट वर स्वत:सह दोघा समर्थकांचा हक्क सांगितला होता. तसेच भाजपांतर्गत स्पर्धक विठ्ठल लंघे यांचा संचालकमध्ये समावेश मुरकुटुंना जिव्हारी लागल्यानेही त्यांनी "ज्ञानेश्वर'च्या निवडणुकीत बिनविरोधसाठी आडकाठी केली होती. मात्र, चंद्रशेखर घुलेंनी आपले राजकीय चातुर्य पणाला लावत मुरकुटेंचे वरील नेत्याविरोधातील बंड थंड केले.
संपादन - अशोक निंबाळकर