esakal | Success Story : पोपटराव पवारांचे हिवरे बाजार पाहिले असेल, आता त्यांची सीताफळ बाग पहा; लाखो कमवायचा सापडेल मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story: Popatrao Pawar earns lakhs of rupees from custard apple orchard

नगर तालुक्यातील पश्चिम भागात असलेले आणि शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले आदर्श गाव हिवरेबाजारचा देशात आणि देशाबाहेर नावलौकीक. नगर तालुक्यातील हिवरेबाजार व परिसरातील साधारण वीस किलोमीटरचा परिसर तसा दुष्काळी.

Success Story : पोपटराव पवारांचे हिवरे बाजार पाहिले असेल, आता त्यांची सीताफळ बाग पहा; लाखो कमवायचा सापडेल मार्ग

sakal_logo
By
सूर्यकांत नेटके

नगर ः आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) गावच्या शिवारासह परिसरातील गावांत शिवारात सीताफळांचा गोडवा निर्माण होत आहे. या भागात अलिकडच्या पाच वर्षांत सीताफळाचे क्षेत्र वाढत आहे. सहा वर्षापूर्वी पद्मश्री पोपटराव पवार यांनी पहिल्यांदा या भागात सीताफळाची लागवड केली. आता हिवरेबाजारसह परिसरातील साधारण दहा गावांच्या शिवारात शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सीताफळ लागवड झाली आहे. यावर्षी पावसामुळे बहुतांश भागात पिकांचे नुकसान झाले असले तरी पवार सीताफळांना सेंद्रीय खताचा वापर करतात. व्यवस्थापनाकडे लक्ष दिल्याने पावसामुळे होणारे नुकसानही थांबवण्यात यश आले आहे. 

नगर तालुक्यातील पश्चिम भागात असलेले आणि शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले आदर्श गाव हिवरेबाजारचा देशात आणि देशाबाहेर नावलौकीक. नगर तालुक्यातील हिवरेबाजार व परिसरातील साधारण वीस किलोमीटरचा परिसर तसा दुष्काळी.

हेही वाचा - नीलेश लंके यांचा नगर तालुक्यातही डंका

या भागात संपुर्ण वर्षभरातील पावसाळ्यात केवळ अडीचशे ते चारशे मीलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे पद्मश्री पोपटराव पवार सरपंच झाल्यानंतर प्रथम प्राधान्याने साधारण तीस वर्षांपासून हिवरेबाजार शिवारात गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांसह विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे कमी पावसातही हा परिसर पाणी असतो. कमी पाण्यावर येणाऱ्या इतर पिकांसोबत आता या भागातील शेतकरी फळपिकांकडे वळले असून सिताफळ लागवडीला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. 

पोपटराव पवारांनी केली सर्वप्रथम लागवड
जलसंधारणाच्या कामामुळे शेताला पाणी उपलब्ध होऊ लागले. मात्र, शेतीसाठी व वापरासाठी पाण्याचा ताळेबंद मांडत मोजून वापर केला जाऊ लागल्याने जास्तीचे पाणी लागणारी पिकांएवजी कमी पाण्यावरील पिके घेण्याला येथील शेतकऱ्यांनी कायम प्राधान्य दिले जाऊ लागले.

देशभर हिवरेबाजारचा नावलौकीक करणारे पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांच्या शेतात पाच एकरावर 2015 साली सर्वप्रथम कृषी विभागाच्या नियमानुसार 15 बाय 15 आकारावर नवनाथ कसपटे यांनी संशोधीत केलेल्या एनएमके गोल्डन सीताफळाची एकरी 160 झाडांची लागवड केली.

गेल्या वर्षापासून पीक हाती येऊ लागले आहे. यंदा पाच एकरात साधारण वीस टनाच्या जवळपास पंचवीस टन सीताफळ निघण्याचा अंदाज व्यक्त केला. याशिवाय पवार यांनी या वर्षी आडीच एकर क्षेत्रावर 14 बाय 8 आकारावर एकरी 300 झाडांची लागवड केली आहे. 
 
80 ते 120 रुपयाचा मिळाला दर 
नगर येथे सीताफळ विक्रीसाठी मोठी बाजारपेठ नसल्याने पवार यांनी पुण्यातील गुलटेकडी व मुंबईतील वाशी बाजारात सिताफळाची विक्र केली आहे. त्यांना सरासरी 80 ते 120 रुपये प्रतीकिलोला दर मिळत आहे. यंदा आतापर्यंत सहा टन सीताफळाची विक्री केली आहे. दर आठ दिवसाला तोडणी केल्यानंतर थेट व्यापाऱ्यांकडे बाजारात सिताफळे पाठवतात. व्यापारी वजननंतर पट्टी करुन दरनुसारची रक्कम खात्यावर जमा करतात. त्यामुळे त्यांचा बाजारात जाण्याचा वेळही वाचतो. 

सेंद्रीय खत वापराचा फायदा 
गेल्या वर्षापासून पवार सीताफळाला 80 टक्के सेंद्रीय व 20 टक्के अन्य खते वापरतात. सेंद्रीय खताच्या वापरात शेणखत, स्लरीसह इतर सेंद्रीय खतासह ठिंबकमधून विरघळणारे सेंद्रीय खते वापर करतात. या शिवाय गोमुत्राची साधारण तीन फवारण्या केल्या. ठिंबमधून दिले. यावर्षी हिवरेबाजार शिवारात सर्वाधिक पाऊस झाला आहे.

दोन महिन्यापूर्वी सिताफळ बागेत सधारण दोन फुट पाणी होते. मात्र पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून पवार परिवाराने बागेच्या व्यवस्थापनाला प्राधान्य दिले. बागेत पाणी साठवून राहत फळांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. शिवाय सेंद्रीय खताचा वापर असल्याने फळांची नासाडी टळली. परिसरात अन्य शेतकऱ्यांच्या सिताफऴांचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी पवार यांचा सेंद्रीय खत व गोमुत्राच्या वापरामुळे फळांचे व झाडांचे सततच्या पावसामुळे होणाऱ्या रोगांपासून होणारे नुकसान टळले आहे.

शिवाय सेंद्रीय खताच्या वापरामुळे अन्य फऴांच्या तुलनेत गोडवा व रसाळपणा अधिक आहे. प्रती फळांची वाढही एक किलोपर्यत झाली असल्याचे बागेचे व्यवस्थापन पाहणारे आशीष गोपीनाथ पवार यांनी सांगितले. 

सीताफळात घेतले आंतरपीक 
पवार यांनी सिताफळाची लागवड केल्यानंतर साधारण चार वर्षे हरभऱा, कांदा व मुगाचे पाच एकर क्षेत्रावर आंतरपिक घेतेले. कांद्याच्या उत्पादनातून दरवर्षी साधारण दोन लाख रुपये, हरभऱा उत्पादनातूव एक लाख व मुगाच्या उत्पादनातून पवंचवीस हजार रुपये मिळाले. त्यामुळे आंतरपिकांतून ठिंबक व अन्य बाबीसाठी सीताफळावर होणारा खर्च निघाला. पवार तीन वर्षापासून दरवर्षी सिताफळाची रोपे तयार करतात. यावर्षी साधारण पाच हजार रोपे त्यांनी तयार केलेली आहेत. याशिवाय दोन वर्षापुर्वी कोकण बहाडुली या वाणाच्या जांभळाची दोनशे झाडांची दिड एकरावर लागवड केली आहे.

परिसरातील गावांतही वाढली लागवड 
दुष्काळी भागाला फायदेशीर असलेल्या सिताफळाची हिवरेबाजारमध्ये पहिल्यांदा लागवड केल्यानंतर पद्मश्री पोपटराव पवार यांनी एमएमके गोल्डन सिताफळाचे संशोधक नवनाथ कसपटे यांचे हिवरेबाजारमध्ये सिताफळ लागवड आणि फायदा या विषयावर व्याख्यान ठेवले होते. पवार यांनी केलेली लागवड आणि कसपटे यांचे मार्गदर्शन एकुन हिवरे बाजारसह परिसरातील जखणगाव, हिंगणगाव, वडगाव आमली, टाकळी- खातगाव शेजारीच असलेले पारनेर तालुक्यातील काळकुप, माळकुप, दैठणे गुंजाळ गावांच्या शिवारात सिताफळांची लागवड वाढली आहे. आतापर्यत परिसरातील गावांत शंभर एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली असल्याचे पोपटराव पवार म्हणाले. 

प्रक्रिया उद्योग उभारणार
हिवरेबाजार व परिसरातील गावांत सिताफळांची लागवड वाढत आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षापासून अन्य भागातही सिताफळ लागवड वाढत आहे. कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढले तर मागणी कमी होत असते. त्याचा दरावर आणि अन्य बाबीवर परिणाम होतो आणि त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. गेल्या दोन वर्षातील सर्वासाधारण लागवड पाहता भविष्यात तशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे हिवरेबाजारमध्ये सिताफळावरील प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नियोजन आहे. 

दृष्टीक्षेपात हिवरेबाजार (क्षेत्र हेक्टरमध्ये) 
रब्बी ज्वारी ः 146, खरीप कांदा ः 190, रब्बी कांदा ः 49. हरभऱा ः 165, भाजीपाला ः 14, चारापीके ः 65, गहू ः 105, चाऱ्यासाठी ऊस ः 5, फुल पिके ः 10, वाटाणा ः 9, फळबाग 49, तुर ः 10, मटकी ः 3, हुलगा ः 4, बाजरी ः 109
 

आमच्या भागात पाऊस कमी पडत असल्याने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर होतो. दरवर्षा पाण्याचा ताळेबंद मांडूनच पुढील नियोजन केले जाते. अलिकडच्या काळात आमच्या शिवारात फळपीकांची लागवड वाढली असून त्यात सिताफळांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मी पहिल्यांदा लागवड केल्यानंतर आता अनेक शेतकरी सिताफळांकडे वळलेले आहे. कमी पाण्यात येणारे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदेशीर म्हणून सध्या सीताफळांकडे पाहिेले जात आहे. केवळ पीक घ्यायचे नाही तर त्यावर प्रक्रिया उदयोग सुरु करण्याचाही शेतकऱ्यांनी विचार करावा.
- पोपटराव पवार, शेतकरी व कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समिती, महाराष्ट्र 
 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image