आई- वडिलांचा भार हलका करण्यासाठी डॉक्टर चढले मळणीयंत्रावर

सतिश वैजापूरकर
Friday, 23 October 2020

सोयाबीनच्या खळ्यावर भुशाने नखशिखांत माखलेला शुभम जिजाबा गुंजाळ हा तरुण पाणी पिताना सहज म्हणाला, मी फिलिपिन्समध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. लॉकडाउनमुळे येथे आलो.

शिर्डी (अहमदनगर) : सोयाबीनच्या खळ्यावर भुशाने नखशिखांत माखलेला शुभम जिजाबा गुंजाळ हा तरुण पाणी पिताना सहज म्हणाला, मी फिलिपिन्समध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. लॉकडाउनमुळे येथे आलो.

आई- वडिलांचा भार हलका करण्यासाठी मळणीच्या कामाला लागलो.' त्याच्या या उद्‌गारांमुळे, शेतमालक रावसाहेब गाढवे अचंबित झाले. त्यांनी लगेचच मळणीयंत्र बंद केले. सर्व मजूर मंडळी शुभमभोवती जमली. आपल्यासोबत डॉक्‍टर मळणी करतो, हे कळाल्यानंतर तेही चकित झाले.

सोयाबीनच्या गंजीवरच त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कपड्यांवर आणि डोक्‍यावरील केसांवर साचलेला भुसा झटकीत तो म्हणाला, मी आई- वडिलांचे पांग फेडणार. एमएस होऊन भारतात परतणार. सोयाबीनच्या भुशाने माखलेल्या शुभमची ही कहाणी थक्क करणारी, तशीच कमालीच्या योगायोगाने भरलेली. त्याचे आई-वडील रांजणगाव खुर्द येथे ऊसतोडणी व शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ध्यानीमनी नसताना, काकडी विमानतळासाठी त्यांची पडीक जमीन संपादित झाली. वीस लाख रुपये भरपाई मिळाली. त्यातील एक पैसाही या दोघांनी स्वतःसाठी खर्च केला नाही. त्याला डॉक्‍टर करण्यासाठी ही रक्कम कारणी लावायचे ठरविले. 

शुभम पंचाहत्तर टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झाला. शेजारच्या वाकडीत त्याचा मित्र व्यंकटेश जाधव रशियात एमबीबीएस करीत होता. त्याने मार्गदर्शन केले. फिलिपिन्समध्ये शुभमला एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. त्याचबरोबर तेथे शिकत असलेला मित्र रवींद्र कोते याची साथदेखील मिळाली. पहिले वर्ष पूर्ण झाले. कोविडमुळे लॉकडाउन सुरू झाले. 

येथे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. त्याने आई-वडिलांचा भार हलका करण्यासाठी स्थानिक मित्रांच्या सहकार्याने सोयाबीन मळणीचे काम हाती घेतले. तो रोज पाचशे ते सहाशे रुपये मिळवतो. आठ-दहा दिवसांपासून मळणीचे काम करतो. 

आई- वडील दिवसभर राबतात. त्यांनी माझ्यासाठी मोठा त्याग केला. ही जाणीव पुढे जाण्याची प्रेरणा सतत देते. मागील वर्षी मला फिलिपिन्समध्ये जुळवून घेण्यात बराच वेळ गेला. आपण एमबीबीएस होणार याबाबत आत्मविश्वास वाटतो. मला "एमएस' होऊन आई-वडिलांचे पांग फेडायचे आहेत. 
- शुभम गुंजाळ, रांजणगाव, ता. राहाता 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story by Shubham Gunjal who is doing MBBS in Philippines