Success story : नोकरी सोडून उंबरीबाळापूरमधील युवकाने केला शेतीत यशस्वी प्रयोग

Success story from Umbribalapur quit his job and did a experiment in agriculture
Success story from Umbribalapur quit his job and did a experiment in agriculture

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील प्रवरा नदीकाठचा पट्टा जलसमृध्द असल्याने बारमाही बागायती शेतीसाठी प्रसिध्द आहे. या परिसरात नेहमी उसाचे मोठे क्षेत्र असते. याशिवाय फारतर गहू, सोयाबिन, कपाशी व चारापिके या पलिकडे शेतकऱ्यांची मजल नसते. या पारंपरिक शेती व पिक पध्दतीला फाटा देत, तालुक्यातील उंबरीबाळापूर येथील महेश भुसाळ या युवकाने यावर्षी भातशेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

प्रवरा डावा कालवा व प्रवरा नदीमध्ये असलेले बागायती क्षेत्र उसाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. वर्षानुवर्ष एकच पीक पॅटर्न असल्याने या भागातील जमिनीची उत्पादनक्षमता घटली आहे. तरीही हमखास आर्थिक उत्पन्न देणारा पीक म्हणून उसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते. तालुक्याच्या पूर्व भागातील उंबरीबाळापूर येथील महेश अर्जून भुसाळ या युवकाने मात्र प्रचलित व्यवस्थेला छेद देणारे पर्याय निवडून शेतीत विविध प्रयोग करण्यास सुरवात केली आहे.

नर्सिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महेशने शिर्डी व एसएमबीटी धामणगाव येथे सुमारे आठ वर्ष नोकरी केली. मात्र चाकोरीबध्द जीवनात त्याचे मन रमले नाही. अखेर त्याने शेती करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला. गावातील आठ एकर क्षेत्रात त्याने, बारमाही पाणी उपलब्ध असल्याने भाजीपाला उत्पादन करण्यास सुरवात केली. त्याच्या जोडीला सुमारे 16 संकरीत गायांच्या पालनातून दैनंदिन सुमारे सव्वाशे लिटर दुधाचे उत्पादन घेत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनोली पट्ट्यात मोडणाऱ्या त्यांच्या जमीनीत सातत्याने साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे ती पाणथळ झाली होती. कोणतेही पीक सडत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पडीक पडली होती. धामणगाव येथील भातशेती करणाऱ्या मित्राच्या सल्ल्याने या क्षेत्राची चिखलणी करुन, ऑगस्ट महिन्यात त्याने 1008 या वाणाची भाताची रोपे लावली. 
यासाठी त्याने ह्युमिक युरिया व तणनाशक पावडर वापरुन पहिला डोस दिला.

त्यामुळे गवत वाढले नाही. त्यानंतरच्या कालात 18ः46 या डीएपी खताचे फुटवा व फुलोऱ्यात दोन डोस दिले तसेच एकदा किटकनाशकाची फवारणी केली. या सर्वासाठी मजुरीसह त्याला सुमारे 12 हजार रुपये खर्च आला. नुकतीच त्याने भाताची कापणी केली असून, 15 पोते साळीतून किमान एक टन उत्पन्न मिळण्याची खात्री असल्याने त्याचा उत्साह दुणावला असून, केवळ चार महिन्यात चांगले उत्पन्न मिळत असल्याने, पुढील वर्षी अकोले तालुक्यातील काळभाताचे उत्पन्न घेण्याचा त्याचा मानस आहे. उसाच्या आगारात, संगमनेर तालुक्यात भातशेतीचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे.

गावातील इतर युवकांनी त्याची प्रेरणा घेवून हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. पाणथळ जमिनीत पिके घेवून ती सडण्यापेक्षा भातशेती केल्यास त्याचा उत्पादन वाढीसाठी चांगला उपयोग होणार असून, कृषीविभागाने या प्रयोगाची अमलबजावणी योग्य स्थळी केल्यास शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाचा मार्ग मिळेल, असे सरुनाथ उंबरकर यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com