
साखर कारखानदारांनो अॉक्सीजन प्लँट उभारा
शिर्डी ः कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी दगावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढते आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखानदारांना ऑक्सिजननिर्मिती प्लॅंट उभारण्यासाठी आवाहन केलं आहे. राज्यात अर्थिकदृष्ट्या सक्षम कारखान्यांची संख्या साठ ते सत्तरच्या घरात आहे. त्यांनी जर हे प्लॅंट उभारले, तर सध्याच्या जिवघेण्या संकट काळात थोडाफार तरी आधार मिळेल.
राज्य सहकारी साखर कारखाना संघाने पवार यांच्या आवाहनाचा हवाला देऊन सर्व कारखान्यांना दोन दिवसांपूर्वी पत्रे धाडली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यासाठी तांत्रिक सल्ला देणार आहे. प्लॅंट व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी करण्यासाठी पुरवठादार व किमती ठरवून देईल, असे या पत्रात नमुद केले आहे.
तथापि, इथेनॉल प्लॅंट मध्ये तयार होणाऱ्या वाफेपासून ऑक्सिजननिर्मिती करायची, तर या कारखान्यांनी तेल कंपन्यांसोबत इथेनॉल खरेदीचे करार केले आहेत. गळीत हंगाम आटोपले असल्याने कारखान्यांकडे वाफ उपलब्ध नाही. हवेतून ऑक्सिजननिर्मिती प्लॅंट उभारण्यासाठी क्षमतेनुसार 50 लाख रुपये ते दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो.
या लाटेत ऑक्सिजनची गरज कित्येक पटींनी वाढल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यातील सक्षम असलेल्या पन्नास ते साठ कारखान्यांनी जरी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारे प्लॅंट उभारले, तरी या संकटात तो आधार ठरू शकेल. यात जर्मन तंत्रज्ञान सर्वोत्तम समजले जाते. मात्र प्लॅंटचा देखील तुटवडा आहे. ते तैवान येथून आयात करावे लागतात. त्यात बराच वेळ खर्च होतो. मात्र त्यास पर्याय नाही.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या सहकारी साखर कारखान्या हवेतून ऑक्सिजननिर्माण करणारा प्लॅंट उभारण्यासाठी पुढाकार घेतला. कोपरगावातील आणखी एक सहकारी साखर कारखाना त्यासाठी पुढाकार घेतो आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यतून असा प्लॅंट उभारण्याचे जाहीर केले. मात्र साईसंस्थानने यात आघाडी घेतली असून, प्लॅंट आठवडाभरात सुरू होईल. त्यावर दोनशे ऑक्सिजन बेडची गरज भासेल. नगर जिल्ह्यातील हा पहिला प्लॅंट असेल.
Web Title: Sugar Manufacturers Set Up Oxygen
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..