पोलिस अधीक्षक पाटील सोमवारी घेणार चार्ज, पब्लिक पोलिशिंग राबवणार

सूर्यकांत वरकड
Friday, 18 September 2020

नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यातील कौलगे येथील रहिवासी आहेत. संगणकशास्त्रात अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

नगर : नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील येत्या सोमवारी (ता. 21) पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, विद्यमान पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या बदलीचे ठिकाण शासनाच्या बदली आदेशात निर्देशित केलेले नाही. त्यामुळे त्यांना नव्या ठिकाणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यातील कौलगे येथील रहिवासी आहेत. संगणकशास्त्रात अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

दरम्यानच्या काळात पाटील यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांची 1998 मध्ये पोलिस उपअधीक्षकपदावर नियुक्ती झाली. कोल्हापूर, सातारा, ठाणे, पुणे व सोलापूर येथे उपअधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक या पदांवर त्यांनी काम केले. 2010मध्ये त्यांना आयपीएस मिळाले. त्यानंतर त्यांनी दौंड येथे राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक म्हणून व ठाणे शहरात उपायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना सोलापूरचे (ग्रामीण) पोलिस अधीक्षक म्हणून नेमले.

सोलापुरात त्यांनी समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले. 
"सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, ""नगर जिल्ह्यात काम करण्याची पहिली संधी आहे. सहकार व पुरोगामी विचारांच्या या जिल्ह्यात "पब्लिक पोलिसिंग'च्या माध्यमातून कायदा- सुव्यवस्थेच्या कामात जनतेचा सक्रिय सहभाग मिळविण्यावर आपला भर राहील.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent of Police Manoj Patil will take charge on Monday