esakal | पारनेर : आमदार लंकेंच्या समर्थकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पारनेर : आमदार लंकेंच्या समर्थकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर (जि. अहमदनगर) : वनकुटेतील सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांच्याकडे, येडूमाता मंदिराचा सभामंडप मंजूर झाला आहे, त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा, अशी मागणी केली असता सरपंच झावरे यांनी मला जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली, अशी फिर्याद मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी आज (ता. १०) पारनेर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार आमदार नीलेश लंके यांचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या अॅड राहुल झावरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा पारनेर पोलिसात दाखल करण्यात आला.

बर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की मला येडूमाता मंदिर सभामंडपासाठी ग्रामपंचायतीचा ठराव हवा होता. मी तो सरपंचांकडे मागितला त्यावेळी झावरे यांनी, मी दशक्रिया विधीसाठी येणार आहे. तू तेथे ये, असे सांगितले. त्या वेळी मी व गावातील प्रल्हाद पवार, नाथा बर्डे त्यांच्याकडे गेलो असता, सरपंचांकडे येडूमाता मंदिराला सभामंडप मंजूर झाला असून, त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा अशी मागणी केली. त्यावर त्यांनी, तुला काय करायचे ते कर, तुला सांगितलेले कळत नाही का, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मी बर्डे यांना मारहाण किंवा शिवीगाळही केली नाही. ही फिर्याद त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून, तसेच दबावापोटी दिली असावी. यातील त्यांनी कथन केलेला सर्व प्रकार खोटा आहे. केवळ राजकीय आकसातून ही फिर्याद दिली आहे.

- अॅड. राहुल झावरे, सरपंच, वनकुटे

हेही वाचा: ‘लोकायुक्त’साठी अण्णा हजारे आक्रमक; राज्य सरकारला दिला अल्टिमेटम

हेही वाचा: "तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना खाली पाहावे लागल्याचे दुःख"

loading image
go to top