
जिल्हा निबंधकांनी तीन महिन्यांपूर्वी बदली केल्यानंतरही बदलीच्या ठिकाणी न जाता, मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थांचे काम पाहणाऱ्या सचिव राजू आडगळे यांना निलंबित करण्यात आले.
श्रीगोंदे (अहमदनगर) : जिल्हा निबंधकांनी तीन महिन्यांपूर्वी बदली केल्यानंतरही बदलीच्या ठिकाणी न जाता, मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थांचे काम पाहणाऱ्या सचिव राजू आडगळे यांना निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या जागी नेमलेल्या सचिवांकडे अगोदरच तीन संस्थांचा कारभार असल्याने सहकार खात्याचा गोंधळ समोर येत आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सहायक निबंधक रावसाहेब खेडकर म्हणाले, की आडगळे यांच्याकडे मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थांचा सचिवपदाचा कारभार होता. त्यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाली; मात्र बदलीच्या ठिकाणी जाण्याऐवजी याच दोन्ही संस्थांचा कारभार पाहत होते. त्यांना वारंवार बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी बजाविले; पण तरीही ते जागीच राहिल्याने कार्यालयीन आदेशाची अवमान व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हास्तरीय समिती सदस्यांनी त्यांचे निलंबन केले आहे.
सचिव आडगळे यांच्याविरुद्ध रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊ मांडे यांनी सोमवारी आंदोलन केले होते. मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थेचा सचिवपदाचा पदभार संतोष पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. पवार यांच्याकडे अगोदरच विसापूर, कोरेगव्हाण व चांभूर्डी येथील संस्थेचा कारभार आहे. आता त्यांच्याकडेच पुन्हा या दोन संस्था सोपविल्याने एक व्यक्ती पाच गावे कशी सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर