esakal | तहलिसदार देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची घेतली भेट

बोलून बातमी शोधा

 RaleganSiddhi

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या कामाचे कौतुक केले. तालुक्याची काळजी घेत असताना तुम्ही तुमची स्वतःचीही काळजी घ्या, असा सल्लाही हजारे यांनी त्यांना दिला.

तहलिसदार देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची घेतली भेट
sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन आणण्यासाठी तुम्ही केलेली धडपड ही खूप महत्त्वाची आहे. अनेकांचे जीव वाचल्यानंतर त्यांचे आशिर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या कामाचे कौतुक केले. तालुक्याची काळजी घेत असताना तुम्ही तुमची स्वतःचीही काळजी घ्या, असा सल्लाही हजारे यांनी त्यांना दिला.

पारनेर तालुका आणखी पाच दिवसांसाठी बंदचे आदेश काढल्यानंतर तहलिसदार ज्योती देवरे यांनी बुधवारी (ता. २८) येथे येऊन हजारे यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यात कोरोना आपत्ती काळात सुरू असलेल्या कामांविषयीची माहिती त्यांनी अण्णांना दिली. या वेळी हजारे बोलत होते.

हजारे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत, मास्क लावणे, सोशल डिस्टंसचे पालन करणे, नियमीत हात धुणे या शासनाच्या सूचनांची अमंलबजावणी केली पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी घरी न थांबता जवळच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत, असे ते म्हणाले.

अण्णा हजारे ही आपल्या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अण्णांना कुणीही भेटू नका, असे आवाहन तहसिलदार देवरे यांनी लोकांना केले. तर गावातील ज्या लोकांचे अत्यंत महत्वाचे काम असेल त्याच लोकांनी सुरक्षित अंतर ठेऊन अण्णांना भेटू द्यावे, अशा सूचनाही त्यांनी अण्णांच्या सुरक्षा रक्षकांना दिल्या आहेत.