तलाठ्याने घेतलेल्या लाचेचा आकडा पाहून हसावं की रडावं

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

रसाळ याने ती रक्कम स्वीकारून सोन्याबापू मगर याच्याकडे दिली. रसाळ व मगर हे दोघेही जेऊर येथील रहिवासी आहेत. 

नगर ः जे नाही लल्लाटी ते लिहिल तल्लाठी असं गंमतीने म्हटलं जातं. परंतु काहींच्या बाबतीत ही म्हण खरीही आहे. अशाच एका तलाठी महाशयाने दमडीसाठी कोंबडी मारली. कारण त्याची नोकरी अडचणीत आली आहे.

शेतकऱ्याकडून 190 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून जेऊर (ता. नगर) येथील तलाठी गणेश भाऊसाहेब आगळे (वय 41, रा. शिरसगाव, ता. नेवासे) यांच्यासह दोन साथीदारांना आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने जेऊर येथे अटक केली. 

याबाबत पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या नोंदीत म्हटले आहे, की विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा इकरारनाम्याप्रमाणे शेतीच्या सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी आगळे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे 190 रुपयांची लाच मागितली.

या बाबत शेतकऱ्याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. "लाचलुचपत'चे उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या निरीक्षणाखाली पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. तलाठी आगळे यांनी आज दुपारी संबंधित शेतकऱ्याकडून 190 रुपयांची लाच खासगी व्यक्ती नामदेव रसाळ याच्याकडे देण्यास सांगितली.

रसाळ याने ती रक्कम स्वीकारून सोन्याबापू मगर याच्याकडे दिली. रसाळ व मगर हे दोघेही जेऊर येथील रहिवासी आहेत. 

दरम्यान, "लाचलुचपत'चे निरीक्षक श्‍याम पवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आगळे यांच्यासह रसाळ व मगर अशा तिघांना अटक केली. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या (ता.17) तिघाही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi arrested for taking bribe