असा दातृत्वाचा हात, त्याची औरच बात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असा दातृत्वाचा हात, त्याची औरच बात

असा दातृत्वाचा हात, त्याची औरच बात

बोधेगाव : एकेक गुंठ्यासाठी, बांधासाठी एकमेकांना रक्तबंबाळ केल्याच्या, खून पाडल्याच्या वार्ता कानी येतात. मात्र, शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील शेतकऱ्याने तब्बल चार एकर जमीन लोकांच्या घरासाठी बक्षीसपत्र करून दिली. ती वर्ग न झाल्याने स्वतःच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केलाय. असे दुसऱ्याचे घर उभे करण्यासाठी झिजणारे विरळाच.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

लाडजळगाव येथील रहिवासी असलेले (कै.) ताराचंद छाजेड यांना परिसरात तारूकाका नावाने ओळखत. त्यांनी अनेक वर्षे दैनिक सकाळचे वितरक म्हणून काम केले. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आदी पदांवर राहून गावातील गोरगरिबांची सेवा केली. शेतातही नवनवीन प्रयोग राबवून शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला. गोरगरिबांच्या सुख-दुःखाची जाणीव असल्याने त्यांनी त्यावेळी जवळपास चार एकर जमीन, गोरगरीब बेघर राहू नयेत, त्यांना आश्रय मिळावा, या उदात्त हेतूने बक्षीसपत्र करून दिली होती.

१३ जानेवारी १९९० रोजी त्यांचा मृत्यू झाला. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी बक्षीसपत्र करून दिलेल्या जागेवर सध्या साधारणतः ५० ते ६० घरे वसली आहेत. तेथे २५० ते ३०० जणांची लोकवस्ती आहे. ती वस्ती तहकीक वस्ती म्हणून ओळखली जाते. ही जमीन अजूनही त्या लोकांच्या नावे हस्तांतरित झाली नसल्याचे ताराचंद छाजेड यांचे पुत्र प्रमोद यांच्या निदर्शनास आले. त्यांनी स्वतःच जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना लेखी पत्र पाठवून, गट क्रमांक ४२४\१ व ५८७ मधील त्या जागेवरील आमचा वारसा हक्क रद्द करून तेथील लोकांच्या नावे नोंद करावी, शक्य झाल्यास वडिलांच्या स्मरणार्थ ''तारूकाका छाजेड तहकीक वस्ती'' असे त्या परिसराचे नामकरण करावे, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

"वडिलांचे विचार आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्यावेळी बक्षीसपत्र केलेली जमीन शासनाने तेथील लोकांच्या नावे तातडीने हस्तांतरित करावी."

- प्रमोद ताराचंद छाजेड, लाडजळगाव (सध्या रा. नगर)

loading image
go to top